मुंबई-गोवा महामार्गाची दैना,
कोण करी विकासाची गणना
रविंद्र कुवेसकर - उतेखोल/माणगांव
ज्या शिवसेनेचा खरा जीव, आत्मा जर कुठे घर करुन राहीला असेल ! तर तो या कोकणच्या लाल मातीतच आहे. आणि तेथिल जनता जनार्दनाचे रस्त्याने जे काही हाल चालले आहेत, ते बघवत नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाकडे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे जेष्ठनेते यांचे अत्यंत विश्वासू रायगडचे नेते, खासदार, मंत्री आणि कोकणातील शिवसेनेचे आमदार, खासदार तसेच आता काँग्रेसही सत्तेत सहभागी आहे. या सर्वांना याबद्दल काहीच कसे वाटत नाही ? असा संतप्त सवाल सर्वसामान्यांच्या मनात खदखदतोय. रस्त्याच्या दैन्यावस्थेमुळे अनेकांचे बळी, अनेक जखमी, अनेक कायमचे अपंग, अनेकांची हाडे, मणके खिळखिळे झाले आहेत.
वाहतूक व्यवसायातील अनेक वाहनांचे मोठे नुकसान, झिज, नाहक खर्च, जळणारे इंधन, बाजार पेठेवर व पर्यटनावर होणारे दुष्परिणाम एक ना अनेक गोष्टींची साखळी तुटते. या मातीतीलच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे येऊन स्थिरावलेल्या अनेकांना याच महामार्गाने जोपासले, त्यांचे फार मोठे नुकसान झाले. लोकशाहीचा चौथास्तंभ पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात गेली अनेक वर्ष ठाम उभे आहेत त्यामुळे हा कधी पूर्ण होणार, संवेदनाहीन सरकार कधी जागे होणार ? अशी विदारक अवस्था मुंबई-गोवा महामार्गामुळे जनतेच्या नशिबी आली आहे. कोकणचा कॅलिफोर्निया नको आधी आहे तोच रस्ता पूर्ण करा ! अशी कोकणवासियांची मागणी आहे.