माथेरानमध्ये जागोजागी खोदल्याने रस्त्यांची वाताहत
चंद्रकांत सुतार -माथेरान
@maharashtramirror.co.in
लाखो रुपये खर्च करून या अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले आहेत परंतु या रस्त्याखालून पाणी जोडण्या गेल्याने या जोडण्याची दुरुस्ती करताना रस्ते खोदले जात आहेत त्यामुळे होत असलेल्या उत्खननाने रस्त्यांची मोठया प्रमाणावर वाताहत झाली आहे.
विविध प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेने रस्त्याच्या कामासाठी खर्च केला आहे. पेव्हर ब्लॉक रस्त्यांमुळे पावसाळ्यात मातीची धूप होत नसून चालण्यास उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत नियोजन ठेकेदारांकडून जी कामे सुरू आहेत ती पूर्ण करत असतानाच खोदलेल्या रस्त्यांची पूर्ववत डागडुजी केली जात नाही त्यामुळे पुढील काळात हे रस्ते लवकरच खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्यावेळी ह्या पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे सुरू होती त्यावेळी येथील काही स्वयंभू आणि स्वयंघोषित अभियंते निर्माण झाले आहेत त्यांनी पेव्हर ब्लॉक निकृष्ठ दर्जाचे आहेत असाच अविर्भाव आणून कामात अडथळा निर्माण केला होता. ती मंडळी रस्त्याच्या होत असलेल्या दुर्दशे बाबतीत मौन बाळगून का आहेत हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुढे सुध्दा या अनेक ठिकाणी क्ले पेव्हर रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत त्यावेळी ही स्वयंघोषित इंजिनियर मंडळी हस्तक्षेप करणार की काही लाभासाठी मौन बाळगणार आहेत असेही बोलले जात आहे.
एकतर नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदारांकडून रस्त्याच्या खोदकाम बाबतीत अनामत रक्कम सुध्दा घेतलेली नाही.गावात कुणाला घरगुती नळ कनेक्शन घ्यावयाचे झाल्यास अगोदरच अनामत रक्कमेची मागणी केली जाते परंतु संबंधित ठेकेदारांकडून अनामत रक्कम का घेण्यात आली नाही यामध्ये काय गौडबंगाल आहे हा प्रश्न सुध्दा अनुत्तरित आहे. हे ठेकेदार काम पूर्ण झाल्यावर इथुन निघून जातील परंतु रस्त्यांच्या डागडुजी साठी नगरपरिषदेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.निदान आतातरी नगरपरिषदेने शहाण्याची भूमिका घेऊन संबंधित ठेकेदारांकडून अनामत रक्कम जमा करावी असेही बोलले जात आहे.