बौद्ध लेण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटेवर्क द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
संतोष सुतार -माणगांव
महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांचे संवर्धन व्हावे याकरिता ५ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारे रायगडचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित धरणे आंदोलन करण्यात आले.
भारत देशाची जन्म व कर्मभूमी गौतम बुद्धांची आहे असा परिचय संपूर्ण जगामध्ये आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये तसेच अनेक बौद्ध राजांनी भारत देशामध्ये बौद्ध स्तूप व विहारे उभारली आहेत. नागपूर येथील अडम, अकोला येथील पातूर व बाळापूर, बुलढाणा येथील भोन, उस्मानाबाद येथील तेर, नाशिक येथील त्रिरश्मी, पुणे येथील कार्ले, पालघर येथील सोपारा या ऐतिहासिक लेण्यांचे आजपर्यंत संवर्धन करण्यात आलेले नाही. शासनाचे या लेण्यांकडे दुर्लक्ष झाले असून या लेण्यांचे संवर्धन करून पर्यटनांचा जागतिक दर्जा देण्यात यावा अशी मागणी बुध्दी स्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून केली जात आहे. याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ ऑक्टो. रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच रायगडचे जिल्हाध्यक्ष सुधीर शिंदे यांनी १२ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व तहसिल कार्यालयासमोर तसेच ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागीय पुरातत्व कार्यालयांवर मोर्चा नेण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तसेच उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी १९ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला व आरोपींवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनामध्ये बुद्धीस्ट इंटरनॅशनल रायगड अध्यक्ष सुधीर शिंदे, कार्याध्यक्ष नितिन गायकवाड, अलिबाग तालुकाध्यक्ष धर्मसेन डवले, रायगडचे प्रभारी दिपक निकोसे, बी .व्ही. मेश्राम , महिला संघाच्या प्रमुख सुजाता कासे, म्हसळा तालुकाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे मैनुद्दीन दळवी, सुर्यकांत कासे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.