कराड पाटण तालुक्यात पावसाचे तांडव कराड विटा रस्ता बंद खरीप हंगामातील पिके पाण्यात
कुलदीप मोहिते -कराड
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा व चक्रीवादळामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे दरम्यान जिल्ह्यामध्ये मंगळवार आणि बुधवार दोन दिवस अक्षरशः पावसाने तांडव घातले आहे
कराड विटा रस्ता पाण्याखाली गजानन हौसिंग सोसायटी मध्ये शिरले पाणी
मंगळवारी व बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे. गुरुवारी आज क-हाड विटा रस्ता पाण्यामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे
पाण्याचा अंदाज नसल्याने वाहनचालक गाडी चालवत पाण्यात शिरत आहेत. त्यामुळे गाडी बंद पडली की ढकलत आणत आहेत. कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी आणि तेथील परिसरातील व्यवसायिकांनी दुकाने बंद केली आहेत सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी वाट मिळेल त्या दिशेने मार्ग काढत घरामध्ये घुसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
गजानन सोसायटीच्या परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे रहिवाशांना आपल्या घरात पाणी शिरू नये याकरता रात्री जागून काढावी लागली. अंगणात लावलेली वाहने रात्री आलेल्या पाण्यामुळे अर्धी बुडलेले आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने उपाययाेजना कराव्यात अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
दोन्ही तालुके गारठले
कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालेला आहे जोरदार पाऊस आणि वारा ह्यामुळे दोन्ही तालुके गारठले असुन थंडीमुळे संसर्गजन्य आजाना निमंत्रण मिळणार आहे सध्या कोयना धरणातून दोन हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणात 104. 28 टीएमसी इतका पाणीसाठा आहे
खरीप हंगामातील पिके पाण्याखाली
कराड पाटण या दोन्ही तालुक्यांमध्ये दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पिकांचे नुसकान झाले आहे ज्वारीचे पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे तसेच अनेक ठिकाणी भाता सह ऊस पीक भुईसपाट झाले आहे
सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला
आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.