कोरेगावात कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी आता सुसज्ज वैद्यकीय सुविधा:आ.शशिकांत शिंदे
प्रतिक मिसाळ -कोरेगाव
कोरेगाव:कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांना लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुसज्ज विस्तारीत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रुग्णांना आता क्षणाचाही विलंब न लावता, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज विस्तारीत कक्ष, आयसीयु सेंटरचे उदघाटन आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, डॉ. संजय चिवटे, डॉ. निलेश दबडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. गणेश होळ, डॉ. नितीन सावंत, तेजस शिंदे, नवनाथ बर्गे, महादेव जाधव,गोरखनाथ नलावडे,पंकज मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणार्या दोनशे रुग्णांसाठी रेमडेसेवीर इंजेक्शन सह अन्य औषधे यावेळी डॉ. सुभाष चव्हाण यांना प्रदान करण्यात आली. टप्प्याटप्प्याने आणखी औषधे पुरवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आपण सर्वांनी वेळीच दक्षता घेतल्याने कोरेगाव तालुक्यात कोरोनाला अटकाव करु शकलो आहे, मात्र सप्टेंबर महिन्यात आलेल्या लाटेत तालुक्यातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत गेली आहे. आरोग्य विभागाने अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णांवर उपचार केल्याने मृत्युदर कमी झाला आहे. तालुक्याची गरज लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरची क्षमता वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता, त्यास तात्काळ मान्यता मिळाली. आरोग्य विभागाने कमीत कमी कालावधीत आयसीयुसह विस्तारीत कक्ष उभारुन एक आदर्श निर्माण केला.असे आमदार शिंदे म्हणाले.
डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले की, कोरोना केअर विस्तारीत कक्षामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष सुविधा असून, प्रत्येक बेडला स्वतंत्र मॉनिटर, लागणारी साधनसामुग्रीसह लागणारा औषधोपचार देखील केला जाणार आहे. प्रत्येक रुग्णावर लक्ष केंद्रीत केले जाणार असून, कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभाग आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षम केला जात आहे.
डॉ. गणेश होळ म्हणाले की, आमदार शशिकांत शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण केले असून, नवीन इमारत देखील त्यांच्या कार्यकाळात उभी राहिली आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर नवीन इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबत आ. शिंदे यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, कोरोना केअर सेंटर सुरु केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून शेकडो रुग्ण या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन घरी सुखरुप परतले आहेत.
डॉ. युवराज करपे यांनी सांगितले की, २० सुसज्ज बेड्सचा विस्तारीत कक्ष कार्यान्वित केला असून, त्यामध्ये अद्ययावत आय. सी. युसह ६ बेड्स, २ व्हेंटीलेटर्ससह बेड्स, पाचशे एम. ए. क्षमतेचे डिजीटल एक्स-रे मशीन, सेंट्रललाईज्ड ऑक्सिजन मशीनचा समावेश आहे. डॉ. संजय चिवटे व डॉ. निलेश दबडे यांनी ग्रामीण रुग्णालयातील उपचार पध्दतीची माहिती दिली.
ग्रामीण रुग्णालय परिसराची यावेळी पाहणी केली. डॉ. सुभाष चव्हाण यांनी अडीअडचणींची माहिती दिली. जुन्या इमारतीपासून नवीन इमारतीपर्यंत जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केला जाणार असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करुन समस्या सोडविल्या जाणार आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी प्रश्न उपस्थित करुन ते सोडवून घेतले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.