पत्रकारांना शासनाने विमा संरक्षण द्यावे -- खा. सुनील तटकरे
राजेश भिसे-नागोठणे
आपल्या राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट फार भयावह आहे. मात्र, बहुसंख्य पत्रकारांची पत्रकारिता चालू आहे. रायगडसह राज्यात कोरोनाच्या महामारीत अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला असून पत्रकारांना शासनाकडून विमा संरक्षण मिळण्यासाठी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असा सल्ला खा. सुनील तटकरे यांनी दिला.
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन सोहळा शनिवारी सायंकाळी येथील आराधना भवनमध्ये संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात खा. तटकरे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. जितेंद्र खेर, शिवराम शिंदे, नरेंद्र जैन, सदानंद गायकर, राजेश मपारा, निजाम सय्यद, गोवर्धन पोलसानी, विलास चौलकर, भाईसाहेब टके, ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप, सोपान जांबेकर, किशोर म्हात्रे, लियाकत कडवेकर आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. कोरोनाची महामारी आणि दुसऱ्या बाजूला रायगडात चक्रीवादळाने घातलेले थैमान अशा दोन्ही घटनांना तोंड देत असताना रायगडातील पत्रकारांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे. पत्रकारांनी वेधक लिखाण केले तर, शासनाचे त्याकडे निश्चितच लक्ष जाऊन प्रश्न मार्गी लागत असतो. पत्रकारांची तसेच जनतेची भावना जाणून घेतली तर, वर्तमानपत्रात प्रसिरद्ध झालेल्या लिखाणावर चिडून न जाता सत्ताधाआतऱ्यांना त्या प्रश्नावर निश्चितच सुधारणा करता येते असे खा. तटकरे यांनी भाषणात पुढे सांगितले. या कार्यक्रमात संघटनेकडून कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार उदय रघुनाथ भिसे (नागोठणे), उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अल्ताफ चोरडेकर (रोहे) आणि गुहागरचे उमेश प्रभाकर शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. खा. तटकरेंच्या भेटीचा दुर्मिळ योग आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला आहे. स्वतः पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. मात्र, राजकारणात प्रवेश केल्याने पत्रकारितेपासून मला दूर जावे लागले याची मला नेहमी खंतच वाटते. पत्रकार खऱ्या अर्थाने सरकारचे तसेच विरोधी पक्षाची भूमिका बजावत असतो. लेखणी हे दुधारी हत्यार असून रक्ताचा एकही थेंब सांडता क्रांती घडवू शकतो असे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बोलले होते व त्याची प्रचिती आजही अनुभवास येत असते असे भाजपचे ज्येष्ठ नेते, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. राजकारणात मोठे व्हायचे असेल तर, सकाळी सर्व वर्तमानपत्र वाचत जा ! असे आमच्या पिताजींनी आम्हा दोन्ही भावंडाना सल्ला दिला होता व आज सुद्धा मी आणि अनिकेतभाई, त्याचे तंतोतंत पालन करीत आहोत. वर्तमानपत्रात स्वतःवर टीका झाली तर, ती मिळालेली सूचना आहे असे समजून काम करीत आहे. आज मंत्री म्हणून आज पहिल्यांदाच आले असले तरी, हे निश्चितच अंतिम वर्ष नसून पुढीलवर्षी सुद्धा येथे येणारच असा विश्वास पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्या वतीने बोलताना उदय भिसे यांनी २६ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी आजही कार्यरत आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री तटकरे यांना जिल्ह्यातील समित्यांवर पत्रकारांची सदस्य म्हणून नेमणूक करावी अशी आग्रही सूचना केली. कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे शाहीर अशोक भंडारे यांच्या पोवाड्याने करण्यात आली. याच कार्यक्रमात जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा मान्यवरांचे हस्ते गौरव 1करण्यात आला. यावेळी संघटनेच्या संकल्प या स्मरणिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिंबाजी गीते यांनी, तर प्रास्ताविक महेश पवार यांनी केले.