आदिवासी विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे दहा शिक्षक आदिवासी अप्पर आयुक्त ठाणे यांचेकडून सन्मानित
महाराष्ट्र मिरर टीम-पेण
जागतिक आदिवासी दिना निमित्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांच्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या दहा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण कार्यालयात करण्यात आला. कर्जत तालुक्यातील मधूरम चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा माणगाव वाडी ( नेरळ ) येथील आदर्श शिक्षक राजेंद्र रामचंद्र म्हात्रे यांना पुरस्कार मिळाला आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण येथील कार्यालयात प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांच्या हस्ते आदिवासी शाळांममध्ये कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी अशा दहा जणांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रकल्पाधिकाऱ्यांनी सत्कार झालेल्या सर्वांना धन्यवाद देऊन भविष्यात असेच अजोड कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आदिवासी समाज हा शहर, गावांपासून दूर डोंगर - दऱ्यांमध्ये राहाणारा असून त्यांच्या पाल्यांवर शैक्षणिक संस्कार करुन त्यांचे जीवन घडविण्याचे काम आम्ही मंडळी जीव तोडून करीत असतो. आज झालेल्या सत्कारामूळे आम्हांला आधिक कार्यक्षमतेने काम करण्याची उर्जा मिळाली आहे. माझा सत्कार हा व्यक्तिगत नसून माझ्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे राजेंद्र म्हात्रे यांनी सत्कार स्विकारल्या नंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले.