श्रीवर्धन उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत चौलकर यांची बिनविरोध निवड...
अमोल चांदोरकर - श्रीवर्धननगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत चौलकर बिनविरोध निवडून आलेले आहेत. शिवसेनेकडून उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकही उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केलेला उमेदवार विजयी झाला. आजमितीस श्रीवर्धन नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जितेंद्र सातनाक विजयी झालेले आहेत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगतदार झाली. शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अनंत गुरव यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत चांगले वातावरण निर्माण केले होते. मात्र खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकानी जितेंद्र सातनाक यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहत त्यांना विजयी केले.जितेंद्र सातनाक विजयी झाल्यानंतर स्थानिक राजकारणात उपनगराध्यक्ष पदासाठी विविध नावे चर्चेत आली. श्रीवर्धन नगरपरिषदेच्या निवडणुकीत माळी, भंडारी, मुस्लिम वोट बँक महत्वाची भूमिका बजावते. त्याचसोबत कोळी फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरत आहे. कोळी समाजातून मोहन वाघे, हरिदास वाघे ही नवीन नेतृत्व उदयाला येत आहेत. त्याचसोबत यशवंत चौलकर अनेक वर्षापासून मुळगाव कोळीवाड्यातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी सर्वसमावेशक धोरणाची आखणी करत यशवंत चौलकर यांना नगरपरिषदेत आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली आहे. यशवंत चौलकर विजयी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चौलकर यांचे अभिनंदन केले.
मी व यशवंत चौलकर आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक श्रीवर्धनमधील जनतेला दर्जेदार सेवासुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत श्रीवर्धनमधील जनतेचा विकास साधने हे आमचे कर्तव्य आहे....
जितेंद्र सातनाक (नगराध्यक्ष श्रीवर्धन )
मला उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे. श्रीवर्धन मधील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी फोन त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने प्रयत्नशील राहील..
यशवंत चौलकर (उपनगराध्यक्ष श्रीवर्धन)