उस्मानाबाद जिल्ह्यात दुकाने व आस्थापनाची वेळ पुन्हा बदलली - जिल्हाधिका-यांचे आदेश
राम जळकोटे-उस्मानाबाद
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 1 ऑक्टोबर पासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशित केले आहे. तसेच जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापनांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. आता सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील. तर मेडीकल व औषधी दुकाने 24 तास चालू राहतील.
जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग उस्मानाबाद जिल्हयातील खालीलप्रमाणे आस्थापना नमुद कालावधीत चालू ठेवण्याबाबत आदेशित करीत आहे.
1. सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू राहतील.
2. सर्व अत्यावश्यक (जिवनावश्यक) नसलेल्या वस्तूंचे मार्केट / दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी राहतील. तथापि, कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट / दुकाने शासकीय यंत्रणेकडून बंद करण्यात येईल.
3. उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील. तर उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास चालू राहील.
4. उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप 24 तास चालू राहतील.
5. उस्मानाबाद जिल्ह्यातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.
6. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात बी-बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने / आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुंषगिक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बिज परीक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील.