Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाजपला मंदिरे उघडण्याची घाई का लागलीय... माजी आमदार तथा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांचा सवाल

 गुजरातला गरबा खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी का करताय - 

खासदार सुनिल तटकरे यांचा सवाल 

 तरुणांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर - राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन


 भाजपला मंदिरे उघडण्याची घाई का लागलीय... माजी आमदार तथा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड  यांचा सवाल

 म्हसळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा Jसंपन्न


अरुण जंगम-म्हसळा
@maharashtramirror.co.in



गुजरातला गरबा खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे यांनी भाजप वर निशाणा साधत सध्या राज्य कोरोना महामारीशी लढा देत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणता खेळ खेळत आहेत असा सवाल रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रविवार, दि.18 ऑक्टोबर रोजी म्हसळा येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा सभेत बोलताना केला आहे.

    


 निसर्ग चक्रीवादळात तात्काळ मदत केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले त्याचबरोबर विद्युत विभागाने मोठ्या परिश्रमाने वादळात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केला त्याबद्दल विद्युत विभागाचे सुद्धा आभार मानले.नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेला कामगार कायदा व कृषी विधेयक घातक असून राज्यात बेरोजगारी वाढेल व शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ येईल.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहिली आहे आणि भविष्यातही

शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घेणार असे खासदार तटकरे यांनी सांगितले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे छातीठोकपणे सांगणारे आणि पवार साहेबांचा पक्ष राहणार नाही असे भाकित करणारे आता कुठे आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे. महाविकास आघाडीची मोट बांधत पवार साहेबांनी साऱ्या देशाला थक्क करीत महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे सुखद धक्का दिला आहे. कोरोनाचे संकट असतानाही महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे याचे पोटशूळ विरोधी बाकांवर बसलेल्यांना येत असून नेहमीच राज्य सरकारला डिवचण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.

 म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात व ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांच्या बाबतीत तालुक्यातील पत्रकारांनी माझी भेट घेऊन प्रश्न मांडले असता मी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी  व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुक्यातील पत्रकारमित्र  आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या संदर्भात देखील संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांचेसोबत चर्चा केली असून येणाऱ्या कालखंडात हे रस्ते देखील सुस्थितीत केले जातील. त्याचबरोबर भविष्यात या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे पर्यटन राज्यमंत्री हे खाते असल्यामुळे या सर्व परिसरात धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन व इतर खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विकासात्मक योजना राबवून येथील तरुणांना याचठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल असे खासदार तटकरे यांनी आश्वासित केले.


 

तरुणांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर - राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेच्या मतरुपी आशीर्वादाने आमदार झाली आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने राज्याची राज्यमंत्री झाले असून सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बांधणीत पक्ष वाढीसाठी विशेष लक्ष देत असतानाच राज्य सरकार मधील मंत्री म्हणून या सर्व परिसरात अधिकाधिक विकासात्मक धोरण राबवून तरुणांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.




 

भाजपला मंदिरे उघडण्याची घाई का लागलीय... माजी आमदार तथा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांचा सवाल


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार यांनी ही भाजप पक्षाला लक्ष करताना सर्व जनता आणि राज्य सरकार कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असताना आणि कोरोनाचे संकट संपले नसतानाही भाजप वाले मंदिरे उघडण्याची मागणी का करीत आहेत आणि मंदिरे उघडण्याची घाई कशासाठी करीत आहे असा सवाल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी माझ्यावर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे ती मी योग्य रित्या पार पाडून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.  



  यावेळी आयोजित मेळाव्याला खासदार सुनिल तटकरे यांसह राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकीत साखरे, प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिप सभापती गीताताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझिम हसवारे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष गणेश पवार, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, पंस सदस्य संदिप चाचले, सदस्या छाया म्हात्रे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, युवक तालुकाध्यक्ष फैसल गीते, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अशोक काते, श्रीवर्धन मतदार संघ युवाध्यक्ष संतोष पाखड, वरवठणे गण अध्यक्ष सतिश शिगवण, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, जिल्हा शांतता कमिटी सदस्य किरण पालांडे, माजी सरपंच संतोष नाना सावंत यांसह नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies