शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती आवश्यक - डॉ रवींद्र मर्दाने
दिनेश हरपुडे
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, तसेच हवामानाचा विचार करता भातानंतर भात ऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड देत शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथील बी. एस्सी. (कृषी)अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वारे या गावात म. गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 'ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या गटचर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळीकार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ मर्दाने यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने विकसित व शिफारशीत केलेल्या भाताच्या विविध वाणांच्या गुणवैशिष्ट्यांचे विवेचन करीत त्याचाच वापर करण्याचे आवाहन केले. मजुरांची वानवा व मजुरीचे वाढते दर लक्षात घेता यांत्रिकीकरणाची कास धरणे आवश्यक असून त्याद्वारे पीक, फळबाग व्यवस्थापन व प्रक्रिया उद्योगामध्ये वेळ व खर्चाची बचत होऊन हमखास उत्पादकता कशी वाढविता येते, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. भाजावळीमध्ये लागणारा वेळ, श्रम, खर्च तसेच जमिनीचा होणारा जैविक ऱ्हास परवडणारा नसल्याने सदर पद्धत हद्दपार करून पर्यावरणपूरक पर्यायी गादी वाफे पद्धतीचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी विद्यापीठाचा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविल्यास शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा १० टक्के अधिक दर मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले. म गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. देशातील ताज्या घडामोडींवर भाष्य करताना आता राजगुरू, भगतसिंग, बटूकेश्वर दत्त व उधमसिंगसारख्या तडफदार युवकांची गरज आहे, असे डॉ मर्दाने म्हणाले.
(छाया-सोहेल शेख)
यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली व त्यांचे शंका निरसन केले.
सुरुवातीला डॉ मर्दाने व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते म गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कु. प्राजक्ता म्हसे हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुचिता ठाकरे हिने केले तर आभार कु. मोहिनी पारधी हिने मानले. निखिल गवळी या विद्यार्थ्यांने व निकेश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भानुदास म्हसे, उत्तम म्हसे, घनश्याम म्हसे,जयवंत ठाकरे , हरिश्चंद्र म्हसे, महादू शिंदे, गणपत घाडगे, देविदास म्हसे, अरुण म्हसे, जयवंत म्हसे, रामदास देशमुख, हरिश्चंद्र चवरे यांच्यासह २१ शेतकरी उपस्थित होते.