इंदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश महाजन यांचे निधन
संतोष सुतार-माणगाव
माणगाव तालुक्यातील इंदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश महाजन यांचे दिनांक (9 ऑक्टोबर) निधन झाले. सायंकाळी 6 वाजता मुंबई येथील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने इंदापूरमध्ये शोककळा पसरली आहे.
दिनेश महाजन हे शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. इंदापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी ते थेट जनतेतून दणदणीत मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने इंदापूरवासियांना धक्का बसला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल खा. सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व मित्रांनी दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, दिनेश महाजन यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने महाजन कुटुंबियांवर तसेच मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, माणगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.