चेन्नई येथील दोन ऑक्सिजन टॅंक्स वेळेत पोहोच
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्यवाही
मिलिंद लोहार -
महाराष्ट्र मिरर टीम-कोल्हापूर
कोरोना तोंड देण्यासाठी व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चेन्नई येथून 6 हजार लिटर क्षमतेच्या दोन ऑक्सिजन साठवणूक टँक्स मागविलेल्या होत्या. टॅंक्स घेऊन येणारा ट्रेलर कोल्हापूर पर्यंत सुखरूपरित्या आणण्याकरीता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती.
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ स्टीव्हन अल्वारिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे , मोटर वाहन निरीक्षक युनुस सय्यद संजय पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शेखर राऊत तसेच वाहन चालक बाळासाहेब कुंभार यांच्या चमूने अतिशय नियोजनबद्ध कार्यवाही करून विहित मुदती पूर्वी हे टँक्स शेंडा पार्क येथील कोव्हिड केंद्रात व संजय घोडावत विद्यापीठ येथील कोव्हिड केंद्र याठिकाणी पोहोच केले.
मुदतीपूर्वी व सुखरूप रित्या ऑक्सिजन टँकर चेन्नई येथून जिल्ह्यात आणल्याबद्दल टॅंकर चालकाचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसाद गाजरे यांनी सत्कार केला. जिल्ह्याची ऑक्सिजन साठवणूक क्षमता आता वाढल्याने कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्याची वाढलेली ऑक्सिजनची मागणी समर्थपणे पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.