पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक:
विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान, मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करावी-विभागीय आयुक्त सौरभ राव
मिलिंद लोहार-पुणे
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून आज विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त सुधीर जोशी, उपायुक्त नयना बोंदार्डे यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा चे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, अभिजित चौधरी, शेखर सिंग व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले.
पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्वांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण लवकरात लवकर द्या. निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा. निवडणूकीचे काम सांघिक भावनेने एकमेकांत समन्वय ठेवून करा. कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन त्यानुसार आपापली जबाबदारी पार पाडा. बोगस मतदान होवू नये, यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्या, असे सांगून मतदान केंद्रावर तक्रारी नंतर पडताळणीअंती बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोविड-19 प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्र निर्जंतुकीकरण करुन घेणे, रांगेत सामाजिक अंतर राखणे, हँड वॉश, सॅनिटायझर पुरवणे आदी व्यवस्था करावी. निवडणूकीच्या अनुषंगाने आयत्या वेळी येणाऱ्या कामांचा विचार करुन या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तयार ठेवा. मतपत्रिका व मतदानाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य वेळेत प्राप्त करुन घेऊन संबंधितांच्या ताब्यात द्या. सोपवलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्या, असे सांगून स्थापन करण्यात आलेली पथके, निवडणूक विषयक झालेले कामकाज व उर्वरित विविध प्रकारच्या कामकाजाचा श्री. राव यांनी आढावा घेतला.उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या कामकाजाची माहिती दिली.
पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचे जिल्हाधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, अभिजित चौधरी, शेखर सिंग यांनी आपापल्या जिल्ह्यात निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत व कामकाजाबाबत माहिती दिली