केंद्रिय पथकाकडून तीन गावांची झाडाझडती
योजना अंमलबजावणीसह लाभार्थींशी साधला संवाद
उमेश पाटील-सांगली
केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रिय पथकाने अलकूड एम, करोली टी आणि हिंगणगाव या तीन गावांची झाडाझडती घेतली. पथकातील अधिकाऱ्यांनी थेट लाभार्थींशी संवाद साधला. योजनांचा लाभ दिला जातो का? याबाबतची माहितीही यावेळी घेण्यात आली.
केंद्राच्या योजनांच्या कामांची पाहणी केंद्रीय समितीकडून गुरुवारी सुरु झाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम आणि करोलीटी या दोन गावांची एस. एस. शुक्ला यांनी तसेच अरविंद कुमार यांच्याकडून हिंगणगाव येथील कामांची पाहणी करण्यात आली. सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. ग्रामीण भागात राबवण्यात येणाऱ्या योजनांची तपासणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने समिती गठित केली आहे. शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासह सर्व योजना तसेच 14 व 15 वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाची माहिती घेण्यात आली.
केंद्रिय योजनांची अंमलबजावणी कशी केली जाते, लाभार्थींची निवड योग्यप्रकारे केली आहे का?, लाभार्थींना लाभ मिळतो का, याबाबचती खात्री करण्यात आली. दोन्ही अधिकाऱ्यांकडून थेट संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थींशी थेट संवाद साधण्यात आला. याशिवाय तिन्ही गावातील ग्रामपंचायतमधील दप्तर तपासणीही करण्यात आली. या पथकाकडून शुक्रवारी ्तासगाव तालुक्यातील आदर्श सांसद गाव आरवडेसह खानापूर तालुक्यातील जाधववाडी, कार्वे, वासुंबे या गावांचीही पाहणी करण्यात आली तर शनिवार 7 नोव्हेंबर रोजी मिरज तालुक्यातील जानराववाडी, इनामधामणी या गावांची पाहणी करण्यात येणार आहे.