बोर्लीपंचतन मध्ये राष्ट्रप्रेमाचे तिन तेरा ,ग्रामपंचायत आवारात बेशिस्त ग्रामस्थांकडून कचऱ्याचा ढीग
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
दिवसभर गावातील कचरा संकलनाचे काम झाल्यानंतर घंटागाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उभी असते रात्रीच्या वेळी काही ग्रामस्थ त्या गाडीमध्ये आपल्या घरातील कचरा आणून टाकतात याबाबत कोणतीही तक्रार असण्याचं कारण नाही परंतु मागील आठवडाभरापासुन दुरुस्तीअभावी ग्रामपंचायत आवारात रात्रीच्या वेळी घंटागाडी उभी नसल्याने काही बेजबाबदार नागरिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आपल्या घरातील कचरा टाकुन अस्वच्छता पसरवुन आपल्या बेशिस्तपणाचे दर्शन घडवीत आहेत.आज मात्र या गोष्टीने कहरच केला असून शनिवार दि.३१ आॕक्टोबरच्या रात्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या ध्वजस्तंभाच्या पुढ्यात कचरा टाकून आपल्यातली विकृत मनोवृत्ती चव्हाट्यावर आणली आहे.
या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक व अन्नपदार्थ असल्याने ते खाण्यासाठी मोकाट प्राणी येतात.तसेच अन्न सडून त्याची दुर्गंधी पसरते.कोरोना सारख्या महामारीला तोंड दिल्यानंतर देखील स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थांकडुन चाललेला हा हलगर्जीपणा गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकतो. कचरा संकलनाची शिस्त ही सर्वांनीच पाळली पाहीजे तरी ग्रामपंचायत कार्यालयाचे व तेथील ध्वज स्तंभाचे पावित्र्य पायदळी तुडवीणाऱ्या लोकांवर सक्त अशी दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडुन होत आहे.