https://www.facebook.com/1529035703843686/posts/3518357208244849/
आनंदवनातील डॉ शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
महारोगी सेवा समिती, आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या डॉ शीतल आमटे- करजगी (वय ३९ वर्षे) यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन स्वहत्या केल्याचे बोलले जात असल्याने आनंदवनात शोककळा पसरली असून राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ शीतल ह्या जगप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात तसेच डॉ विकास व डॉ भारती आमटे यांच्या कन्या होत्या. त्यांचे पती गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य व अंतर्गत व्यवस्थापक असून त्यांना शर्वील नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.
सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजताच्या दरम्यान आनंदवनातील त्यांच्या राहत्या घरी सदर घटना घडली असल्याचे बोलले जाते. डॉ. शीतल यांना त्या अवस्थेत वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक खोब्रागडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केले. त्यांनी नेमके कोणते विषारी औषध वापरले ते कळू शकले नाही परंतु त्याचा नीट तपास होण्यासाठी त्याचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
प्रेत उत्तरीय तपासणीनंतर आनंदवनातील श्रध्दावनात बाबा - ताईंच्या समाधी जवळ आमटे पारिवारिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा अंतिम संस्कार होणार असल्याचे कळते.
मागील काही वर्षापासून आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. कौस्तुभ आमटे ,डॉ. शीतल आमटे - करगजी, डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांच्यातील पराकोटीच्या वैमनस्यामुळे आनंदवनाची प्रतिमा मलिन होत होती. आनंदवन व आमटे कुटुंबियांबद्दल जनमानसात असलेल्या आदराच्या भावनेमुळे कोणतेही प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी नामवंत मंडळींनी पुढाकार घेऊन वाद थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, असे कळते. एवढेच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनीही सामोपचाराची भूमिका घेत सर्व काही सुरळीत आहे, असे वृत्तपत्राच्या माध्यमातून जनमानसात संदेश पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु डॉ शीतल आमटे यांच्या धक्कादायक मृत्यूमुळे आनंदवनातील वादावर पडदा पडण्याऐवजी विविध चर्चांना पेव फुटले आहे.