ऐन दिवाळीत शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ...
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडसह गड किल्ले , पर्यटन स्थळे स्मारके पर्यटकांसाठी खुली ..
नरेश कोळंबे-कर्जत
ऐन दिवाळीत शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे . स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत . रायगड जिल्हयातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे तसेच स्मारके खुली करण्यात आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत .
मागील आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता . ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्था , संघटना , दुर्गप्रेमींकडून केली जात होती . महाड येथील मनोज खांबे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता . परंतु आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रायगड किल्ल्याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे शिवाय त्यावर आधारीत रोजगार पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र हे करताना कोरोना काळात सोशल डिस्टन्सींग , मास्क वापरणे यासारख्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे .
किल्ले रायगड खुले झाल्याने पर्यटक व दुर्गप्रेमी यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बरेच बाईकस्वार या दिवाळी मध्ये दिवाळी पहाट साजरी करण्याकरिता रायगड येथे जात असतात आणि ह्याच काळात किल्ले रायगड खुले झाल्याने पर्यटनाची आवड असलेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.