महाराष्ट्रातील पहिले हिंद केसरी पै.श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारसाठी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून लाख मोलाची मदत
शासनामार्फतही सर्वोतोपरी मदत करणार - सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही
पै.श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ साईप्रसाद व डॉ कौस्तुभ यांचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी मानले विशेष आभार
निरंजन पाटील
महाराष्ट्र मिरर टीम-कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महाराष्ट्रातील पहिले हिंदकेसरी श्री. खंचनाळे यांच्याबाबतची बातमी समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डाॕ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच उपचारामध्ये विशेष लक्ष देण्यात यावे यासाठी डायमंड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ साई प्रसाद यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संवाद साधला होता.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही आज आवर्जून श्रीपती खंचनाळे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाशी तसेच आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेशी संवाद साधला. यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री खंचनाळे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ साईप्रसाद व डॉ कौस्तुभ यांचे विशेष आभार मानले. यापुढील काळातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुस्तीपटूना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क करावा, आपण कुस्तीपटूसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत अशी ग्वाही यावेळी डॉ शिंदे यांनी दिली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तसेच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्यात येते , यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिवसेना भवन येथील मुख्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.
यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.