Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मनसेचे गांधीगिरी मार्गाने आंदोलन

 मनसेचे गांधीगिरी मार्गाने आंदोलन

 राजेश भिसे-नागोठणे



 सरकारने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तुम्हाला खड्ड्यातच घालायचे ठरविले असून स्वतःला कोणतीही इजा न करता या रस्त्यावरून गाड्या चालवा ! असा वाहनचालकांना मोलाचा संदेश देत रोहे तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज बुधवारी सकाळी नागोठणे रोहे मार्गावर गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पेणकर, रोहे तालुका चिटणीस प्रल्हाद पारंगे, मनविसेचे तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष विनायक तेलंगे, रोहे शहर अध्यक्ष मंगेश रावकर, माथाडी सेनेचे नागोठणे शहर अध्यक्ष नरेश भंडारी, हरिश्चंद्र तेलंगे, अंकुश पाटील, मनझर मुजावर, प्रफुल्ल पाटील, सचिन पारंगे, मनोज पारंगे आदी सहभागी झाले होते. 


नागोठणे रोहे मार्गावर आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा या तीन किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. सोमवारी सकाळी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांचे हस्ते या रस्त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु सोमवारी ७ तारखेला एक दिवस काम केल्यावर मंगळवारपासून काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. मनसेकडून या रस्त्याबाबत मागील दोन महिन्यांपासून संबंधित विभागाचे लक्ष वेधल्यानंतरच कामाला सुरुवात करण्यात आली होती असा दावा रोहे  प्रल्हाद पारंगे यांनी दावा केला होता. नारळ तेव्हा कोणाच्याही हाती वाढवला असला तरी, काम चालू झाल्याबद्दल मनसेकडून समाधान व्यक्त केले होते. मात्र, एक दिवस कामाचा फार्स करून दुसऱ्या दिवशीपासून काम बंद केल्यामुळे पूर्वी ठरविल्याप्रमाणे आज बुधवारी काही काळ सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले असे त्यांनी स्पष्ट केले. 



याबाबत आंदोलनात सहभागी झालेले अमोल पेणकर यांना विचारले असता, आताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहुल मोरे यांचेशी संपर्क साधला असून डांबर उपलब्ध नसल्याने काम थांबविले आहे व येत्या तीन चार दिवसांत कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले आहे. तीन चार नव्हे तर एक आठवड्यात सुद्धा काम चालू झाले नाही.तर , आपल्या अलिबागच्या कार्यालयात येऊन मनसे स्टाईलने आपल्याला त्याचा जाब  विचारला जाईल, अशी सूचना त्यांना दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंधरा मिनिटे चालू असलेल्या या आंदोलनादरम्यान मनसेकडून करण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies