महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल
मिलिंद लोहार -पुणे
पिंपरी येथील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी टूम शोधली आहे. ती टूम एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक तरुणी चक्क या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ सध्या शहरात व्हायरल होत आहे.
एका वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी टूम शोधली आहे.
पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. या वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेनं कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले.
दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, या व्हिडिओची दखल घेतली असून, व्हिडिओची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. व्हिडीओत दिसणा-या इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल.
विभागाला कलंकित करण्याचा कोणताही कर्मचारी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे डिसले यांनी सांगितले.