कृषी विधेयक शेतकरी विरोधी-सुरेश लाड
कृषी विधेयक आहे त्याला बऱ्याच राज्यांनी विरोध केला असून शेतकऱ्यांचे हित या विधेयकात राखलं जात नाही,शेतकऱ्यांच्या मालाची हमी नसून याचे दर हे कॉर्पोरेट सेक्टर ठरवणार असल्याने शेतकरी यात उद्ध्वस्त होईल असे प्रतिपादन कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी केले आहे ते आज ठिय्या आंदोलनात कर्जत प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात बोलत होते.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू असून त्याचा धागा पकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर तासभराचे ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी बोलताना लाड पुढे म्हणाले, साधारणपणे आपण स्टेप बाय स्टेप तक्रार करतो पण या विधेयकात फक्त प्रांतांकडे तक्रार केली की तिथे जो निर्णय लागेल तो अंतिम असेल त्याची कुठेही तक्रार करता येणार नाही असे प्रावधान असल्याने ही कसली लोकशाही असा प्रतिप्रश्न करून लाड पुढे म्हणाले ,देशाच्या पुढचे प्रश्न न सोडवता ते कसे चिघळत ठेवायचे हेच बघितलं जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
खोपोली येथील दत्ता मसुरकर यांचेही यावेळी भाषण झालं.या ठिय्या आंदोलनात महिला व तरुणांचा मोठया प्रमाणात सहभाग होता.
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.