शिवरुद्र अकॅडमीचे मल्लखांब कराटे व लाठी काठी प्रशिक्षण सुरु
अकॅडमी दर्जेदार खेळाडू निर्माण करेल... प्रांताधिकारी अमित शेडगे
अमूलकुमार जैन-मुरुड
शिवकालीन युद्धकला आपल्या इतिहासाची साक्ष देणारी अनमोल ठेव आहे. आजच्या तरुण पिढीला शिवकालीन युद्धकलेची ज्ञान प्राप्त करून देणे निश्चितच कौतुकास्पद आहे. शिवरुद्र अकॅडमी निश्चितच दर्जेदार खेळाडू निर्माण करेल असे प्रतिपादन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. शिवरुद्र अकॅडमी सुरु केलेल्या मल्लखांब कराटे व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अमित शेडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मल्लखांब विदयेचा नियमित सराव केल्यास शरीर बळकट बनते.
कराटे या खेळामुळे व्यक्ती आत्मनिर्भर बनतो व स्वसंरक्षणासाठी सक्षम बनतो. व्यक्ती विकासामध्ये शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. या खेळामुळे व्यक्तीमध्ये सहनशीलता, प्रेम, धैर्य याचे संगोपन केले जाते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त हा गुण महत्त्वाचा आहे. खेळामुळे व्यक्तीच्या वर्तनात शिस्त आपोआप निर्माण होते. खेळात किंवा इतर कुठेही यशस्वी होण्यासाठी शिस्त ही गरजेची आहे. समृद्ध समाज व समृद्ध समाज मन निर्माण करण्याचे काम खेळाद्वारे केले जाते. तुम्ही तुमच्या खेळांमध्ये खेळाच्या सरावामध्ये सातत्य अबाधित ठेवणे नितांत आवश्यक आहे. नियमित केलेल्या सरावामुळे तुमच्या खेळांमधील चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. असे अमित शेडगे यांनी सांगितले. सदरच्या कार्यक्रमात श्रीवर्धन चे तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमात शिव रुद्र अकॅडमी चे प्रमुख शैलेंद्रा ठाकूर, कमलेश रटाटे, साहिल यादव, सुमित महाडिक व प्राची गुरव उपस्थित होते.