तासगावात भाजपाला गळती:खासदार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढली
राजू थोरात तासगाव
तासगाव शहरातील माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, कवठेएकंद येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी, सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने यांनी खासदार गटाला रामराम ठोकून शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. या सर्वांचा आज 'मातोश्री'वर सेना प्रवेश झाला
खासदार गट या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच आता सावळजमध्येही भाजप गटाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. सावळजमधील ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी अनिल थोरात व अरुण पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह उद्या (रविवारी) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अंजनी येथे आमदार सुमन पाटील यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
सावळजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील गट एकमेकांसमोर उभे आहेत. ही निवडणूक काट्याची होण्याचे संकेत आहेत. दोन्ही गट ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी व्युहरचना आखण्यात येत आहे. अशातच खासदार गटाला निवडणुकीपूर्वीच भगदाड पडण्यास सुरुवात झाल्याने या गटाची व पर्यायाने भाजप खासदार संजयकाका पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे
खासदार संजयकाका पाटील यांचे होम पिच तासगाव तालुका आहे.त्यांचे गाव चिंचणी आहे.
अंतर्गत वादामुळे भाजपला खिंडार पडत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे