पोलीसांनी श्रमदानातुन पोलीस ठाणे केले चकाचक इतरांनाही आदर्शवत
रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव
माणगांव पोलीस ठाण्यातील परिसर चक्रीवादळात खुपच नुकसानग्रस्त झाला होता. पोलीस ठाणे इमारतीवरील वरील पत्रे उडाले, आजुबाजुला असलेली मोठी झाडे पडणारा पालापाचोळा तसेच आत मधिल सामान इतरस्त्र विखुरले होते. यामुळे याठिकाणी अस्वच्छता वाढलेली पोलीसांनाही जाणवत होती. अखेर वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांनी ही गोष्ट जाणली आणि स्वयंस्फूर्तीने आपल्या सहकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणुन दिली. तशी सुचना काढली आणि माणगांव पोलीस ठाण्याच्या अगदी महिला पोलीसांसह सोमवार दि. ७ रोजी सकाळी आठ ते दीड वाजे पर्यंत श्रमदानातून फावडे, घमेली, झाडू हाती घेऊन; पोलीस ठाण्याच्या आतील परिसराची चकाचक स्वच्छता केली.
परिसरात सरपटणारे जीव, सापांचाही वावर दिसुन येत होता. ब्रिटीश कालीन कचेरी असे नावलौकीक असलेल्या पोलीस ठाण्यात तुरुंगाच्या खोल्याही आहेत. याठिकाणी पोलीसांचा, नागरिकांचा दैनंदिन वावर असल्याने अंतर्गत स्वच्छता फार महत्वाची. असे सर्व पोलीस बांधवांना मनोमन वाटत होते. आता आतील भागात खडी अंथरुन व कडेला माती टाकुन शोभिवंत फुलझाडे व गवत-गालीचे लावुन परिसराचे सुशोभिकरण होत आहे. हे अतिशय प्रशंसनिय काम त्यांनी केले असुन माणगांव मधिल इतर शासकिय कार्यालयातील तसेच नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी देखील याचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रदिप देशमुख यांच्या पुढाकाराने स्वच्छतेच्या एका चांगल्या संदेशाचे दर्शन नकळतच माणगांवच्या पोलीसांमुळे घडले आहे.