निवृत्तीनंतरचे जीवन
प्रियांका ढम-
नोकरीनंतरचे आयुष्य म्हणजे स्वल्पविराम फक्त. निवृत्ती हा आयुष्याचा पूर्णविराम नसून, 'यंग सीनिअर्स' म्हणून धमाल करण्याची वर्षे आहेत, अशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे आवश्यक आहे. याचविषयी आजच्या पेन्शनर्स दिनानिमित्त ......
सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच 'स्व'चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. एकदा का आनंदाचा ठेवा सापडला, की निवृत्तीचा अर्थ उमजायला लागतो.
पूर्वी निवृत्तीनंतर हाती येणारा पैसा खूप कमी किंवा पुरेसा नसायचा. एकत्र कुटुंब असल्याने जबाबदाऱ्या खूप असायच्या; पण आता असे वातावरण राहिले नाही. कुटुंबे आता लहान झाली आहेत. निवृत्तीचे वयही ठरलेले असते. निवृत्त होणारी व्यक्ती आपल्या निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा याचा विचार अगोदरच करून ठेवतात; म्हणूनच म्हणतात, की आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वीइतके करूण राहिलेले नाही. आता निवृत्त किंवा ज्येष्ठ न म्हणता 'यंग सिनिअर्स' संबोधण्यात येते. त्यामुळे म्हातारणाकडे तुम्ही झुकले आहात, ही जाणीव कमी केली जाते. त्यामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा परत साठीनंतरचे येणारे तारुण्य उपभोगू लागल्या आहेत. जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.
एकंदर पाहता निवृत्तीनंतरचा विचार निवृत्तीपूर्वीच केलेला बरा. जेव्हा मनुष्य रोजच्या कामात मग्न असतो, खूप धावपळ होत असते, तेव्हा त्याला विश्रांती हवी असते; पण सक्तीची विश्रांती समोर येते, तेव्हाच नेमकी धांदल उडते. निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून निवृत्ती. जीवनातून नव्हे. आयुष्याला पूर्णविराम नसून, स्वल्पविराम असतो; कारण अजून बरेच आयुष्य बाकी असते.
आता निवृत्त लोक क्रियाशील असतात. त्यांच्यात शारीरिक, मानसिक क्षमताही असतात. खूप जण आपली राहिलेली इच्छा आणि छंद पूर्ण करताना दिसतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ, इष्ट, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखावह व्हावी, एवढीच अपेक्षा असते. त्यासाठी ते 'मॉर्निंग वॉक'ला जातात. त्यांचे ग्रुप तयार करतात. गप्पा मारतात. ज्येष्ठ नागरिक संघात जातात. त्यात होणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा, सहली यांचा आस्वाद घेतात. सकस आहार घेऊन, नियमित व्यायाम करून आरोग्य सांभाळून जीवन सुखात घालविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलाबाळांच्या जीवनपद्धतीशी जूळवून घेतात. आपल्या नातवंडांमध्ये डावे-उजवे करणे, गरज नसतानाही घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे, उठसूट सल्ले देणे, नातवंडांच्या प्रत्येक कृतीला नाक मुरडणे या गोष्टी टाळतात.
असे असले, तरी पूर्वनियोजन नसल्याने काही ज्येष्ठांना निवृत्तीनंतर काय करायचे तेच समजत नाही. एखादा दगड उतारावरून सोडला, तर तो जसा वाट फुटेल तिकडे जातो. तशी त्यांची अवस्था होते. दिवस त्यांना खायला उठतो. एकटेपणामुळे लोक नैराश्यग्रस्त होतात. आयुष्य धकाधकीत गेलेले असते. सतत कार्यमग्न राहण्याची शरीराला, मनाला सवय झालेली असते. त्यामुळे काही जण नोकरीतूनच नाही, तर आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागतात; पण ही त्यांची शारीरिक बाब नसते, तर अशी माणसे शरीराआधीच मनाने निवृत्त होतात. त्यासाठी छोटेसे का होईना; पण नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास ठेवला तर मन तरुण राहाते. तरुण पिढीशी नातेसंबंध चांगले कसे राहतील, त्याकडे लक्ष द्यायला हवे. भौतिक गोष्टींतून मन काढून घेता आले पाहिजे.
काहींना निवृत्त झाल्याक्षणी समाजातील आपले स्थान अचानक कोणीतरी काढून घेतले आहे. आपण दुय्यम आहोत, असे वाटू लागते. या होणाऱ्या बदलाची आधीपासून तयारी केली असेल, तर निवृत्तीनंतरची ही वर्षे प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाळ बनू शकतात. नोकरीच्या खुर्चीशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात. स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व... सारे अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे.
मग ती स्त्री असो किंवा पुरुष सर्वातून निवृत्त होता आले पाहिजे मग तो संसार असो किंवा नोकरी असो , चिकूच्या बी सारखं चिकू परिपक्व झाला की ती अलगद बाहेर पडते कुठेही न अडकता पण तस् आंब्याच्या बाबतीत होत नाही त्याची कोय आतपर्यंत अडकलेली असते गाभ्यामधे मग लोक तिचाही पुरेपूर आस्वाद घेवून फेकून देतात पण तिला पिळून पिळून खातात मगच फेकून देतात म्हणून या मोहजाळा मधे अडकु नका तुमचं निवृत्ती नंतरचे जीवन कस व्यतीत करायचं याचा संपूर्ण अधिकार तुमच्याकडे आहे राहिलेली सप्न, छंद पूर्ण करा ....
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबाने पण त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे मुलगा म्हणून आता त्यांच्या जबाबदाऱ्या स्वताच्या खांद्यावर घेणं सूनानी समजून घेणं नातवंडं यांनी पण आजोबा आजी यांच्या कडून चांगले संस्कार घ्यावे त्यांना कुठेतरी अडगळीची रूम न देता त्यांना सर्व गोष्टीत सामील करून घेणे गप्पा गोष्टी करणे आणि आपल्या बरोबरीने सर्व गोष्टी आता समजावून सांगणे हे संपूर्ण कुटुंबाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे कारण आजपर्यंत त्यानी केलेल्या कष्टावर तुम्ही ठामपणे उभे आहात त्यांनी इतकी वर्षे आपल्या आयुष्याची नोकरी - चाकरी करत मान अपमान सहन करत स्वतःची कोणतीही हौस मौज न करत पै -पै करत जमवले म्हणून तुम्ही आज यशस्वी पणे गरुड भरारी घेवू शकता हे विसरू नका तो वटवृक्षाचे खोड आहे तो वयाची ६० वर्षे तुमच्यासाठी झटत होता राबत होता म्हणून आज तुम्ही त्या वटवृक्षाच्या फांद्या बनून आनंदाने डोलत आहात हे विसरू नका म्हणून आज पेन्शन त्यांना मिळते ती त्यांना हवी तशी हवी त्या मार्गाने खर्च करू द्या त्यांच्या पेन्शन वर जगायची मुलां- मुलींनी, सूनेनी अपेक्षा ठेवू नका उलट आता तुम्ही त्यांना चार पैसे देवू करा बघा मग हीच लोक आनंदाने आणि अभिमानाने तुमचं तोंडभरून कौतुक करतील त्यांची अडचण न मानता त्यांना स्वाभिमानाने जगवा एकत्र कुटुंपद्धती अजूनही लाभदायक आहे नाहीतर आजी आजोबा दाखवण्यासाठी शाळांच्या सहली वृध्दाश्रमाकडे नेतात आपल्या मुलांना आजी आजोबा काका काकू मामा मामी या सर्वांमध्ये राहू द्या पण त्यासाठी तुम्ही पण त्या सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे प्रत्येकाच्या श्रमाची किंमत ठेवली पाहिजे त्यामुळे निवृत्ती धारकांना प्रेमाने आपुलकी ने वागवा ... कारण आपल्यावर पण ती वेळ आज ना उद्या येणारच आहे याची पण जाणीव ठेवा ....
सर्व निवृत्ती धारकांना पेन्शनर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा..... आनंदी राहा सुरक्षित रहा ....स्वस्थ रहा मस्त जगा आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या ...मनुष्य जन्म पुन्हा नाही त्यामुळे यंग पेन्शनर्स म्हणून जगा .......