अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरने प्रवीण खोब्रागडे ठार तर मंथन बावणे जखमी
प्रशासनाच्या नाकर्तेपणाने जनतेत असंतोष
राजेंद्र मर्दाने -चंद्रपूर
अवैध वाळू तस्करी करणार्या माफियांकडून गुपचूप हप्ते वसुली करून त्यांना अभय देणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाने कळस गाठल्याने राजरोसपणे ट्रॅक्टरने वाळू तस्करी सुरू आहे. मालकाच्या सांगण्यावरून बेदरकारपणे वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने अंधाधुंदपणे ट्रॅक्टर चालवून दुचाकीस्वार प्रवीण खोब्रागडेला ठार केले तर मंथन बावणे यास जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अभ्यंकर वार्डातील स्नेहनगर चौकात आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली होती. अवैध वाळू तस्करीमुळे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच वरोरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या घटनेनंतर तहसील विभागाकडून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात महसूल प्रशासनाने विशेष मोहीम चालविली आहे. कळमगव्हाण, करंजी व वडकेश्वर घाटाजवळ चेक पोस्ट लावले असून यात आळीपाळीने ३ कर्मचारी गस्त
देतात. याशिवाय एक भरारी पथकही नेमण्यात आले आहे, असे असूनसुध्दा दिवसाढवळ्या वाळूची तस्करी खूप काही सांगून जाते. अवैध वाळू तस्करी संबंधात विविध पक्ष, संघटनेतर्फे महसूल प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वाळू तस्करांकडून शहराच्या विविध वार्डातून मनमानी पद्धतीने मुरुम, वाळूची तस्करी सुरुच आहे.
या प्रकरणात तहसीलदार मार्फत वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याचे कळते. पोलिसांनी फरार ट्रॅक्टर चालक व अनोळखी ट्रॅक्टर मालका विरुदध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तहसीलचे गेट बंद केले
तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची अवैध वाहतूक सूरु असून ती तात्काळ बंद करण्यासाठी यापूर्वी विविध पक्ष, संघटनेतर्फे महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या संदर्भात आंदोलनही करण्यात आले. महसूल विभागा तर्फे संबधितांना आश्वस्त करण्यात आले. अवैध गौण खनिज तस्करांच्या विरोधात कडक पाऊल उचलण्यात येत असल्याचे वारंवार सांगण्यात आले. परंतु यावर अंकुश लावण्यास महसूल विभागाला यश आले नाही. अवैध गौण खनिजांच्या वाहनाच्या वर्दळीने आधीच त्रस्त झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा संयम या अपघातानंतर सुटला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी तहसीलचे मुख्य गेट बंद करून रास्ता रोको केला. स्थानीक महसूल यंत्रणा वाळू माफियांशी हितसंबंध राखून असल्याने त्यांच्यावर विश्वास उरला नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रकरणात संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.