हरवलेली मुलगी 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश
देवा पेरवी-पेण
पेण तालुक्यातील हमरापूर गावात आपल्या परिवारासोबत वीटभट्टी कामासाठी आलेल्या व अचानक हरवलेल्या निकिता नाईक या 11 वर्षीय मुलीस 2 तासात शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यात विटभट्टीचे उत्पादन जोरात सुरू असते. आणि या रोजगारासाठी दरवर्षी प्रमाणे हिवाळा सुरू झाल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातील अनेक कुटुंब पेण तालुक्यातील अनेक गावांत येत असतात. याच रोजगाराच्या शोधात अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावातील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टी कामासाठी हमरापूर गावात आले आहेत. त्यांचं वीटभट्टीचे काम ही सुरू आहे. मात्र कालच्या संध्याकाळी त्यांची 11 वर्षीय निकिता नितीन नाईक ही मुलगी खाऊ आणण्यासाठी हमरापूर गावात गेली असता ती उशिरा आल्याने तिचे वडील तिला ओरडल्याने ती रात्री 8 च्या सुमारास घरातून रागात निघून गेली. बिबट्याच्या अफवेची दहशत आणि रात्रीचे 11 वाजले तरी आपली मुलगी घरी न आल्याने तिची आई शांता नाईक हिने थेट जोहे गावातील दादर सागरी पोलीस स्टेशन गाठले. व मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
मुलगी हरविल्याची तक्रार येताच दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक के.आर.भऊड, सहाय्यक फौजदार शिवाजी म्हात्रे, हवालदार रवी मुंडे, जगताप, होमगार्ड आदेश पाटील, करे यांच्या पथकाने अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने हमरापूर जंगल भागात शोधा शोध सुरू केली. मात्र घरी गेलो तर वडील मारतील या भीतीने निकिता ही झाडांच्या मागे घाबरून लपून बसलेली सापडली. तिला ताब्यात घेऊन व धीर देऊन तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली.
रात्रीच्या अंधारात फक्त 2 तासात सदर मुलीला शोधल्याने दादर सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व देवदूत कल्पेश ठाकूर यांचे नाईक परिवार व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.