अन.. पंढरपुरातील 36 गाढवे निघाली थंड हवेच्या ठिकाणी...
महाराष्ट्र मिरर टीम-पंढरपूर
भीमा नदीच्या काठी वाळवंटात उन्हात वाळू उपसा करणाऱ्या तब्बल 36 गाढवांच्या नशिबी आता चक्क तामिळनाडूतील थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा योग आला आहे. तब्बल 36 गाढवांना ऊटीला पाठवण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात भीमा नदीकाठी अहोरात्र वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू चोरांकडून ट्रॅक्टर आणि बहुतेक वेळा गाढवांचा वापर केला जातो.
बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या 36 गाढवांना पंढरपूर शहर पोलिसांनी पकडले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता याच सर्व गाढवांना तामिळनाडूतील येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर एनिमल अँड नेचर संस्था येथे पाठवण्यात आले.
पंढरपूर शहर व तालुक्यातून गाढवांच्या सहायाने अहोरात्र वाळूचा उपसा वाळू चोर करत असतात. पोलीस आणि महसूल विभागाच्या वतीने अनेक वेळा संबंधित चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु पोलिसांची चाहूल लागताच वाळू चोरटे पळून जातात आणि सापडतात फक्त वाहतूक करणारी गरीब बिचारी गाढवे.
अनेक वेळा असा प्रकार झाल्यानंतर आता पोलिसांनी या गाढवांच्या विरोधातच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि वाळवंटात उन्हात फिरणाऱ्या गाढवांच्या नशिबी आला थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचा योग.
पंढरपूर शहर पोलिसांनी भीमा नदी काठावर तीन ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांना पोलिसांनी पकडले. या गाढवांना कुठे ठेवायचे आणि काय करायचे असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला.
गाढवांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नसल्याने तामिळनाडू राज्यातील इंडिया प्रोजेक्ट फॉर ॲनिमल अँड नेचर संस्था निलगिरी उटी येथे पाठवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार पंढरपूर पोलिसांनी पकडलेल्या छत्तीस गाढवांची रवानगी आता निलगिरी उटी येथे करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरची गाढवे ऊटीच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत.