कालव्यात पडला गव्यांचा अख्खा कळप
निरंजन पाटील-कोल्हापूर
कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात गवारेड्यांचा अख्खा कळप पडल्याची घटना कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या हद्दीत घडली. या कळपात सहा गवे असून ते सर्व प्रौढ आहेत. सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते.
घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सध्या दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. उंदरवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात गव्यांचा कळप पडल्याचे दिसले. ही बातमी परिसरात समजताच गव्यांना पाहण्यासाठी कालव्यावर लोकांनी गर्दी केली होती.
सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे सर्व गवे वाहत जात होते. त्यांनी पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतू कालव्याचे अस्तरीकरण केल्याने गव्यांचे पाय निसटत होते.