Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राज्यात बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या नागरिकांनी घाबरून जावू नये

Top Post Ad

राज्यात बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही
कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या नागरिकांनी घाबरून जावू नये

 पशुसंवर्धन विभागाची माहिती

मिलिंद लोहार - पुणे 



राज्यात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोंबडयांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मर्तूक झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या मांसहारी नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही. तसेच स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणा-या ठिकाणांवर असाधारण स्वरुपाची मर्तूक आढळून येण्याच्या प्रसंगामध्ये त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.


बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पाँग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशांमधून स्थलांतरीत झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणा-या बदकांमध्ये मर्तूक आढळून आली आहे. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H5N1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनी शेजारच्या भागामध्ये नमूद रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

राजस्थान राज्यातील झालवाड आणि जोधपूर आणि मध्यप्रदेश राज्यातील इंदौर जिल्ह्यांमध्ये कावळयांमध्ये मर्तूक झाली असल्याचे देखील दिसून येते. निशाद संस्थेद्वारे या मर्तूकीसाठी बर्ड फ्लु रोगाचा H5N8 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान करण्यात आले आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने  तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमूने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमून्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. 

स्थलांतरीत होणा-या जंगलीपक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणा-या ठिकाणांवर बर्ड फ्लू रोगाचे सर्व्हेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आल्या आहेत. राज्यात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोंबडयांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मर्तूक झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुटपालक, अंडी व मांस खाणा-या मांसहारी नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही. तसेच स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणा-या ठिकाणांवर असाधारण स्वरुपाची मर्तूक आढळून येण्याच्या प्रसंगामध्ये त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.