Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ , वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ , वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिक मिसाळ-महाबळेश्वर



महाबळेश्वरचा पर्यटन विकास करताना तो पर्यावरणपुरक होईल यावर भर देण्यात यावा . महाबळेश्वरची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी वेण्णा तलावाची उंची वाढविणे , तलाव परिसराचा विकास करणे , शॉपींग एरीयाचा विकास करणे तसेच महाबळेश्वर भागात पोलो ग्राउंड तयार करणे या कामांचे प्रस्ताव जलदगतीने सादर करावेत , अशा सूचना मुख्यमंत्री श्री . उद्धव ठाकरे यांनी आज संबंधीत विविध अधिकाऱ्यांना दिल्या . महाबळेश्वरचा पर्यटन विकास करण्याच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले . यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे , मुख्य सचिव संजयकुमार , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता , मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह , पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर - सिंह , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर , एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील , पर्यटन संचालक डॉ . धनंजय सावळकर , पंकज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते . 



सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते . मुख्यमंत्री म्हणाले की , महाबळेश्वर पर्यटन आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि अधिक कालावधी स्वरूपात आराखडा करून कामाची वर्गवारी करावी व त्याची टप्पानिहाय अंमलबजावणी करावी . असे करताना कमी कालावधीची जी कामे तात्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे . महाबळेश्वर मार्केट , रस्ता रुंदीकरण व लेक परिसर याची कामे जी तत्काळ सुरू करता येतील ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत . पर्यटनाला दर्जा रहावा , पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावीत . विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे . जे काम करू त्या कामाचे डिझाईन , काम सुरू होण्याची तारीख , संपण्याची तारीख , कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे फलक लावावेत . ही कामे झाल्यास पर्यटक वाढतील , पर्यायाने स्थानिकांना लाभ होईल हे त्यांना समजावून सांगावे . वन , पर्यावरण , पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करावीत , अशा सूचना मुख्यमंत्री श्री . ठाकरे यांनी यावेळी दिल्या . महाबळेश्वरमध्ये पोलो मैदान करता येऊ शकेल . ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे . त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे , पण त्यास केंद्रीय वन संवर्धन कायद्यांतर्गत केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते , त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा , अशा सूचना यावेळी देण्यात आल्या . त्या मैदानाचे सपाटीकरण केल्यास तिथे पोलो स्पर्धा आयोजित करता येतील . हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल . वेण्णा लेक परिसर 31 जानेवारीपर्यंत सुशोभित करावा . महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे . यात साहसी पर्यटन , निसर्ग पर्यटन , हेरिटेज पर्यटन , धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्राचा समावेश करता येईल.आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे . महाबळेश्वरमध्ये 5 एमएलटी पाणी क्षमता आहे , ती 19 एमएलटीपर्यंत वाढवता येऊ शकेल , त्यामुळे तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी . बाजारामधून पाणी निचरा होणाऱ्या नाल्या बंदिस्त कराव्या , त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून त्यात एक समानता आणण्यास मदत होईल , अशा सूचना यावेळी दिल्या . पर्यटन मंत्री श्री . ठाकरे यावेळी म्हणाले की , राज्याचा विकास करताना तो पर्यावरणपुरक व्हावा यावर भर दिला जात आहे . 



महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याचा समतोल साधला जाईल हे पाहणे गरजेचे आहे . महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची यादृष्टीने अंमलबजावणी केली जाईल , असे ते म्हणाले . रस्ते , वाहतूक व्यवस्था , पदपथ , बाजारपेठ यांची रचना , तेथील रंगसंगती , पथदिवे , व्हर्टिकल गार्डन , रस्ते क्रॉसिंग , निर्मिती यांच्यात एकवाक्यता असावी . वाहतुकीचे व्यवस्थापन असावे , अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या . सध्याच्या पायाभूत सुविधा 2011 च्याच आहेत , पण पर्यटक मोठ्या संख्येने वाढले , हे लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी करता येईल . 2001 मध्ये महाबळेश्वर इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर झाले . देशातील हा पहिला इको सेन्सेटीव्ह झोन असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने उच्चधिकार समिती स्थापन केली आहे . त्यांच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही विकास काम करता येत नाही . 2014 मध्ये प्रमुख पर्यटन आराखडा तयार केला पण तो विषय नंतर पुढे गेला नाही . महाबळेश्वरमध्ये रोज 17 ते 18 हजार पर्यटन क्षमता आहे , परंतु सिझनमध्ये 35 ते 40 हजार पर्यटक येतात , अशी माहिती यावेळी देण्यात आली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies