म्हसामध्ये जमावबंदी लागु करण्याची ग्रामपंचायतची मागणी
सुधाकर वाघ-मुरबाड
ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी म्हसा येथील खांबलिंगेश्वर यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरत असते. साधारण पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. नवसाला पावणाऱ्या म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी तसेच बैल जोडी , घोंगडी, ब्लॕंकेट, चादरी , टोपल्या, विविध प्रकारची भांडी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे, मुंबई, रायगड, पुणे येथुन भाविक येत असतात. परंतु या वर्षी कोरोना संकटामुळे यात्रा होणार नसल्याचे प्रशासनाने घोषित केले आहे. तरी सुद्धा काही अतिहौशी भाविक, अतिउत्साही नागरिक याठिकाणी येऊन गर्दी करु शकतात.
म्हसा ग्रामपंचायत परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये किंवा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून म्हसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व प्रशासक यांनी मुरबाडचे तहसिलदार यांना म्हसा ग्रामपंचायत क्षेत्रात 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021पर्यंत
144 जमावबंदी आदेश लागू करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे