तासगांव तालुक्यातील बेंद्रीच्या सचिन जाधव या जवानाचे आंध्रात अपघाती निधन
गावावर शोककळा पसरली , आज दुपारी निघणार अंत्ययात्रा
राजू थोरात -तासगाव
बेंद्री ( ता. तासगांव ) या गावचे सुपुत्र व चित्तूर , आंध्रप्रदेश आयटीबीपी ५३ बटालियनचे जवान सचिन जाधव (वय- ३०) यांचे आंध्रप्रदेशात शनिवार दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने बेंद्री गावावर शोककळा पसरली. सोमवारी दुपारी १२.३० पर्यंत पार्थिव पोहोचेल. पार्थिवाचे अंत्ययात्रेनंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तासगांव पासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंद्री या छोट्याशा गावातील शिवाजी जाधव हे शेतकरी कुटुंबातील. त्यांना दोन मुली तर सचिन हा एकुलता एक मुलगा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेंद्री या गावीच झाले. तर पुढील १२ वी पर्यंतचे शिक्षण तासगावात घेतले. १२ वी नंतर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत देशसेवेसाठी २०१० मध्ये ते भरती झाले होते.पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातुन पदवीही प्राप्त केली. सध्या ते आयटीबीपी ५३ बटालियन , चित्तूर आंध्रप्रदेश येथे कार्यरत होते.
जवान सचिन जाधव हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे गावातील प्रत्येकाशी अत्यंत चांगले व जिव्हाळाचे संबंध होते.गावी आल्यानंतर गावातील प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होत. सामाजिक कार्यातही ते सक्रिय असत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात ते काही महिने बेंद्री या गावीच होते. लॉकडाऊन नंतर ते आंध्रप्रदेशमध्ये नोकरीच्या ठिकाणी गेले होते. ६ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना ३वर्षाचा मुलगा आहे. तर महिन्याभरापूर्वी कन्यारत्न झाले आहे. या कन्येच्या नामकरण विधीसाठी ते आपले कर्तव्य बजावून आंध्रप्रदेश मधून गावी येण्यासाठी निघाले असताना त्यांचे अपघाती निधन झाले.आपल्या कन्येचा नामकरण कार्यक्रम जोरदार करायचा असे त्यांनी ठरवले होते. मात्र हे नियतीला मान्य नव्हते. छोट्या छकुलीला पाहण्या अगोदरच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाचे वृत्त रविवारी बेंद्री या गावी समजले. निधनाचे वृत्त ऐकताच सारा गाव शोकसागरात बुडाला. प्रत्येक जण हळहळत होता. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. देशसेवा करीत असलेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राला डोळे भरून पाहण्यासाठी गावकऱ्यांच्या नजरा पार्थिव येण्याची वाट पाहत होत्या.
आज सोमवारी दुपारी १२.३० पर्यंत पार्थिव बेंद्री या गावी पोहचेल. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.