जलसंपदा विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले ....
कास धरण उंची वाढवण्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करा आ . शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सूचना ; कामाचा घेतला आढावा
प्रतिक मिसाळ -सातारा
सातारा- कास धरण उंची वाढवण्याचे काम वाढीव निधी अभावी रखडले होते . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९ १ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे . कास धरण प्रकल्प हा सातारा शहर आणि कास परिसरातील आसपासच्या १५ गावांसाठी महत्वाचा आहे . यासाठी निधी उपलब्ध झाला असून हा जिव्हाळ्याचा प्रकल्प तातडीने पूर्ण झाला पाहिजे . उर्वरित राहिलेले काम पाहता येत्या १५ मे पर्यंत कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करा , अशा सूचना आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या . वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता . ना . अजित पवारांनी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना . पवारांनी काही दिवसांपुर्वी आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७.९ १ कोटी निधी मंजूर करून दिला . कास प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरु व्हावा आणि सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवार दि . २० रोजी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली . यावेळी जलसम्पदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ , सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . बैठकीत आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला .
साताराशहर आणि कास मार्गावरील सुमारे १५ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी हा प्रकल्प मार्गी लावणे अत्यावश्यक आहे . ना . अजित पवार यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला आणि त्यांच्याचमुळे आता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाला आहे . सर्व प्रकारचे शासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने कामाला प्रारंभ करा . राहिलेली कामे त्वरित हाती घेऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा . या प्रकल्पाचे काम दर्जेदार करून ते वेळेत पूर्ण करा आणि या भव्यदिव्य प्रकल्पाला सातारकरांच्या सेवेत लवकर रुजू करा , अशा सूचना आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या .