बाळासाठी आईचा कराेनाशी लढा...!
साै.पूनम सुरेश भालेराव, वय वर्षे 30. पती सुरेश भालेराव सह मोलमजुरी करून उरण रोड वरील गवळीवाडा येथे राहणारी महिला. करोनाचे संकट तर सुरुच होते. अशातच सौ.पूनम यांचा अपेक्षित प्रसूती कालावधी साधारणत: 22 जानेवारीचा असेल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला होता. मात्र करोनासदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 4 जानेवारी रोजी तातडीने दाखल करण्यात आले. त्यांचा दि.5 जानेवारी रोजी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सौ.पूनम यांना आधी दोन अपत्ये आहेत. हे तिसरे अपत्य अपेक्षित होते. मात्र करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वचजण चिंतातूर झाले. त्यात सौ.पूनम यांचे वजन 55 कि.ग्रॅ.होते, तर हिमोग्लोबिन जे 10 हवे हेाते ते फक्त 7.4 इतकेच होते. त्यामुळे डॉक्टरांनाही चिंता वाटत होती.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे यांच्यासह डॉ.सचिन संकपाळ, डॉ.प्रियंका म्हात्रे, डॉ.अरुणा पोहरे, डॉ.संजय गुडे, स्टाफ नर्स शुभांगी पंडेरे, भाग्यश्री सिंग, पूनम लाहाेट या सर्वांनी सौ.पूनम आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला, त्यांचे योग्य ते समुपदेशन केले आणि ही सर्व टीम पहिली कोविडग्रस्त गरोदर माता साै.पूनम यांची प्रसूती यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. सर्वांसाठीच हे माेठे आव्हान होते. मात्र योग्य ज्ञान, हिंमत, आत्मविश्वास, अनुभव आणि टीमवर्कच्या जोरावर या टीमने सर्व तयारी पूर्ण केली. दि.8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 14 मिनिटांनी, 2.4 कि.ग्रॅ. वजनाच्या सुंदरशा, गोड अशा मुलीला सौ.पूनम यांनी जन्म दिला. त्यांची प्रसूती सुखरुप झाली. बाळ आणि आई दोघींचीही तब्बेत छान आहे.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.प्रमाेद गवई या सर्वांच्या प्रोत्साहनाने पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या टीमने पहिल्या कोविडग्रस्त मातेची यशस्वी प्रसूती करण्यात यश मिळविले.
त्यांच्या प्रयत्नांनी सौ.पूनम यांनी कराेनावर तर मात केलीच परंतु एका छानशा सुंदर परीलाही जन्म दिला. आज आई अन् मुलगी दोघांचीही तब्येत अतिशय उत्तम आहे.
म्हणूनच आपण सर्वजण मान्य करतो की, जगातली कोणतीही आई आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाचीही बाजी लावते... मातृशक्तीला त्रिवार वंदन...!!!