ओजीवले येथे लोकसहभागातुन बांधला वनराई बंधारा
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील ओजिवले ग्रामपंचायत हद्दीमध्ये लोकसहभागातुन पिशव्यांचा वापर करुन वनराई बंधारा बांधण्यात आल्याने या बंधाऱ्यांच्या पाण्याचा शेतीसाठी चांगला उपयोग होणार आहे.
पावसाळी हंगाम संपल्यानंतर काही कालावधीपर्यंत ज्या नाले व ओढयामधुन पाण्याचा प्रवाह चालू असतो, अशा नाले,ओढयातील पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने आडवून पाण्याचा साठा करुन पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा म्हणजे रिकामी पोती, माती वापर करुन वनराई बंधारा बांधला जातो. अशाच प्रकारचा ओजिवले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावतील ग्रामस्थ यांच्या मदतीने नदीमध्ये एक वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यांचा फायदा ओजिवले गावातील भेंडी, काकडी, वांगी यासारखा भाजीपाला पिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच हा वनराई बंधारा बांधण्यासाठी 250 पिशव्याचा वापर केला. हा बंधारा बांधण्यासाठी 35 स्री आणि 15 पुरुषांनी सहभाग घेतला होता अशी माहिती ओजिवले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नंदु इसामे यांनी दिली. हा वनराई बंधारा बांधतांना पं.स.कृषिअधिकारी आर.आर.जाधव, विस्तार अधिकारी कृषी एल.एस.बडगुजर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.