क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील बाल शिशु कक्षाची गृह राज्यमंत्र्यांनी केली पहाणी
मिलिंद लोहार - सातारा
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बाल शिशु कक्षात घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात जाऊन नवजात बालकांच्या कक्षाची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
यावेळी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व प्रशिक्षणार्थी आय.पी.एस. अधिकारी अंचल दलाल यावेळी उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील शिशु वार्ड सन 2015 मध्ये अत्याधुनिक केला असून वार्डमधील वायरिंग, मशिनरी आधुनिक असून सुस्थितीत आहेत. आधीच दिलेल्या सूचनेनुसार या हॉस्पिटलमध्ये अग्निरोध यंत्रणा बसविण्यात आलेले असून कालच हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील घेण्यात आलेले आहे. या हॉस्पिटलमधील स्टाफ हा प्रशिक्षित असून शिशु वार्ड हा चांगल्या स्थितीमध्ये असून अत्याधुनिक आहे. तसेच राज्य सरकारने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने या हॉस्पिटलचेसुध्दा सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. सुरक्षा ऑडिट करताना काही सुधारणा कराव्या लागल्या तर त्या तातडीने कराव्यात.
तसेच खबरदारीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांनी दिल्या. त्यासाठी काही निधीची आवश्यकता असल्यास पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही ते यावेळी ते म्हणाले.