तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सातारकारांवर ओढवेल आ . शिवेंद्रसिंहराजे
कास पाणीपुरवठ्यासाठी वाढीव क्षमतेची पाईपलाईन करण्याच्या सूचना
प्रतीक मिसाळ-सातारा
पुढील ५० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून कास धरण उंची वाढवण्याचे काम मंजूर झाले . त्यासाठी वाढीव ५८ कोटी निधीही उपलब्ध करून दिला आहे . येत्या १५ मे पर्यंत हे काम पूर्णत्वास जाणार आहे . असे असले तरी वाढीव पाणी क्षमता गृहीत धरून त्या क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे . याबाबतीत सातारा पालिका प्रशासनाकडून सर्व्हे , इस्टिमेट आदी काहीच कार्यवाही झालेली नाही . कास धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा व्हायचा असेल तर नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे . अन्यथा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सातारकारांवर ओढवेल अशी चिंता व्यक्त करतानाच नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सर्व्हे , इस्टिमेट आणि प्रस्ताव तयार करा , अशा सूचना आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला केल्या . गेल्या काही वर्षांपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे . सातारकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी सुरुवातीला ४३ कोटी तर , नुकताच ५८ कोटी वाढीव निधी मिळवून दिला . यांनतर या प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा युद्ध पातळीवर सुरु झाले . दरम्यान , या प्रकल्पाचे काम येत्या १५ मे ला पूर्णत्वास जाणार आहे . कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले तरी सातारकरांना मात्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे . कास धरणाची उंची वाढल्यानंतर पाणी पातळीत पाच पट वाढ होणार आहे . कास धरणापासून सातारा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ ९९ ८ ते २००० या कालावधीत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते . उंची वाढल्यानंतर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा वाढीव क्षमतेने होणार नाही . वाढीवपाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव क्षमतेची नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे . याकडे पालिका प्रशासनाने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे . वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक असून त्यासाठी सर्व्ह करून इस्टिमेट तयार करणे आणि तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे . कास धरणातून सायफन पद्धतीने सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो . यासाठी विजेची अथवा कोणत्याही मशिनरीची गरज भासत नाही . या योजनेमुळे पालिकेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडत नाही . असे असूनही या बाबीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येताच आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना तातडीने सर्व्ह करून इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या . याबाबत तातडीने कार्यवाही करून वाढीव जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा . स्वखर्चाने नवीन जलवाहिनी टाकणे पालिकेचे बजेट पाहता पालिका प्रशासनाला शक्य होणार नाही . या कामासाठी निधी कसा मिळवायचा आणि सातारकरांचा हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी बघतो , असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले . वाढीव क्षमतेची जलवाहिनी नसल्याने धरणाचे काम पूर्ण होऊनही सातारकरांना पाणी मिळणार नाही . ही बाब गंभीर आहे . मग धरणाची उंची वाढवून काय फायदा ? त्यामुळे पालिका प्रशासनाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने सर्वे आणि इस्टिमेट करून प्रस्ताव पाठवा अशा सक्त सूचना आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकाऱ्याना केल्या आहेत .