लोकशाही मजबुतीसाठी पत्रकारांचे योगदान
महत्वाचे आहे - दीपा बापट
तासगावात पत्रकारदिन उत्साहात, ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या वैशाली बेहनजी यांची उपस्थिती
राजू थोरात-तासगाव
अन्याय झालेल्या प्रत्येकाच्या प्रश्नांना वाचा फोडत त्याला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करतात. लोकशाही मजबूत करण्याचं महत्वपूर्ण काम वृत्तपत्रांच आहे. त्यामुळे त्यांचे स्थान कायम अबाधित राहील, असे मत गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी व्यक्त केले.
तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ब्रम्हकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालयाच्या तासगाव केंद्र प्रमुख वैशाली बेहनजी, चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पराग सोनवले उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाल्या की सोशल मीडीया साधन प्रचंड वाढले आहे. यामुळे वृत्तपत्रे वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आजही वृत्तपत्र ही बातम्यांची विश्वासार्हता ठरवण्याचे प्रमाण मानले जाते. त्यामुळे वृत्तपत्र ही कधीच बंद होणार नाहीत. त्या पुढे म्हणाले, माणसाचे जीवन अधिक धकाधकीचे बनले आहे. अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर रहावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेची आहे. ही बाब लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघाने पुढाकार घेऊन तालुक्यातील पत्रकारांना १ लाखांच्या विमा पॉलिसीचे वाटप केले आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
तासगाव सारख्या संवेदनशील तालुक्यात प्रशासन पत्रकारांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. समाजातील घडणाऱ्या घटना मांडण्याबरोबरच समाजात विधायक बदल घडविण्यासाठी पत्रकारिता महत्वाची आहे.
यावेळी बोलताना वैशाली बेहनजी यांनी वैचारिक पत्रकार हा समाजासाठी झटत असतो. त्यामुळे त्याचे वैयक्तिक कौटुंबिक नुकसान होत असते. असे असताना पत्रकारांसाठी कल्याण निधी योजना गरजेची आहे. त्यांचं मानसिक स्वास्थ व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी ध्यानधारणा व संस्थेच्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी राजस्थान माउंट अबू येथून ब्राम्हकुमार राजयोगी कोमल भाईजी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी चिंचणी प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी पराग सोनवले, वाहतूक पोलीस महेश माने व अक्षय धुमाळ यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संजय माळी यांनी करताना विविध सामाजिक उपक्रमातील संघटनेचा सहभाग असल्याचे सांगितले. विमा संरक्षण योजना गेल्या दहा वर्षांपासून सभासदांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजीराजे जाधव यांनी आभार मानले.