आगरदांडा पोर्टच्या मुख्य गेट समोर स्थानिकांचे आंदोलन
थकबाकी रक्कम व नोकरीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची केली मागणी
अमूलकुमार जैन-मुरुड
दिघी पोर्ट विकासाला आता सुरुवात झाली असून काही प्रमाणात नोकर भरतीला सुद्धा सुरुवात झाली आहे.परंतु नोकर भरती करताना ती गुपचूप केली जाते व स्थानिकांना याची कोणतीच कल्पना दिली जात नसल्याने स्थानिक नागरिकांना डवले गेल्याने दिघी पोर्ट संलग्न असलेल्या आगरदांडा बंदर च्या मुख्य गेट जवळ आगरदांडा ग्रामपंचायतीमधील समस्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आपली ताकद दाखवत मोठे आंदोलन केले.यावेळी मुरुड तालुका शिवसेना अध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर यांच्या मुख्य उपस्थितीत कंपनी प्रशासनास रीतसर निवेदन देण्यात आले आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा विभागात दिघी बंदर चे मोठ्या प्रमाणात विकासाचे काम सुरु आहे.सदरच्या बंदर विकासासाठी आगरदांडा येथील स्थानिक लोकांनी दि.बी एम कंपनीच्या अंतर्गत दगड,मातीचा भराव,रेती,ग्रिट्स ,मशीनरी भाड्याने देणे व कंपनीला पाणी देणे अशी अनेक कामे करून सुद्धा आगरदांडा येथील स्थानिक नागरिकांचे सुमारे १२ कोटी रुपये बाकी ठेवले आहेत.त्यामुळे स्थानिक नागरिक कर्जबाजारी असून बँकेचे व्याज विनाकारण भरावे लागत आहे.त्यामुळे आता कंपनी सुरु होत असल्याने प्रथम आमची बाकी रक्कम द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे.
दिघी पोर्टच्या विकासासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी तसेच धुळीचा मोठा त्रास सुद्धा सहन केला.आता कंपनी सुरु होत असताना स्थानिक लोकांना नोकर भरती मध्ये घेतले जात नाही याचा पचंड रोष येथील स्थानिकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला आहे.
यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी जनतेला शांत रहाण्याचे आव्हान करून आपण आपल्या मागण्या कंपनी प्रशासनाकडे ठेवण्यास सांगितले.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे स्थानिक लोकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कंपनी प्रशासना कडे दिले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनकडे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने ज्या सेवा शर्ती अटी घालून दिल्या आहेत त्या प्रतीची सुद्धा मागणी केली आहे.
यावेळी मुरुड तालुका शिवसेना अध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर.उपसरपंच युसूफ अर्जबेगी,सूर्यकांत तोडणकर,संतोष पाटील,नरेंद्र हेदुलकर,आरपेक्ष चिंदरकर,शांताराम हीलम,अमजद डायजी,प्रवीण खोत.मौलाना नवीद गजगे ,हेमंत तोडणकर,राजेश जाधव सुरेश पाटील,रवींद्र मोरे,रामा आरकर,अखलाक सोंडे,आदी सह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.