पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती बनल्या शोभेची वस्तू
दक्षिण रायगड मध्ये एकही अधिकारी नाही, पशुधन उपचारविना, शेतकऱ्यांमध्ये संताप
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,म्हसळा, तळा तसेच महाड तालुक्यात गेल्या १ ते २ वर्षांपासून एकही पशुधन विकास अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील पशुधन च आता धोक्यात आले आहे. तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे.
श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे असतानादेखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. याठिकाणी असलेले लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दोन वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत आहे. दांडगुरी , बागमांडला याठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या इमारती शासनाने लाखो रुपये खर्चून बांधली आहेत. परंतु सध्या ती निरूपयोगी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, पर्यवेक्षक, अधिकारीविना पशुचिकित्सालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.
श्रीवर्धन, म्हसळा तसेच माणगाव तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे व शेती हिताच्या दृष्टिकोनातून इतर पशु आहेत. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकाकडून जनावरांवर उपचार केले जातात. परंतु शस्त्रक्रियासारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुचिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नाही. परंतु या ठिकाणी अपेक्षित असा उपचार पशुंना मिळत नाही. विविध रिक्त पदे, औषधींचा तुटवडा अशा बाबी याठिकाणी नित्याच्याच झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येतो. श्रीवर्धन तालुक्यातील तीन श्रेणी एक चे तीन दवाखाने असताना एकही पशुधन विकास अधिकारी नाही. माणगाव, म्हसळा तसेच तळ्यातही कुणीच अधिकारी नाही. श्रीवर्धन तालुक्यात नऊ पदे रिक्त आहेत. अनेक ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांची ४३ पदेही रिक्त आहेत. त्यामुळे घटसर्प, एकटांग्या रोगाच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. तालुक्यातील पशुधन सेवा देण्यासाठी तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण मोहीम पशुचिकित्सालय दवाखान्यातून केली जाते मात्र सध्या होत नसल्याचे समोर आले आहे. तर काही ठिकाणी उपकेंद्रासाठी शासकीय इमारत नाही.
कर्जत तालुक्यात १० अधिकारी
- जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २७ पदे भरली आहेत मात्र त्यातील १० पदे हि एकट्या कर्जत तालुक्यात भरली आहेत. तर दहा जणांवर पूर्ण तालुका व इतर तालुक्यांचा अतिरिक्त भार आहे. जिल्ह्यात तीन लाख सात हजार पशुधन घटक आहेत.
सभापतींच्याच तालुक्यात अधिकारी नाही. -
जिल्हा परिषद चे कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे हे म्हसळा तालुक्यातील आहेत मात्र या तालुक्यातील पशुधनचा विकास अधिकारीच नाही.
जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत पालकमंत्रयांना निवेदन दिले आहे. लवकरच पदे भरण्यात यावी यासाठी मागणी केली आहे.
बबन मनवे, सभापती, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा रायगड.
बबन मनवे, सभापती, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा रायगड.
शिस्ते गावात गेल्या काही दिवसात ४-५ शेळ्या दगावल्या. अचानक पणे अशी घटना झाल्याने माणगाव येथील डॉ शहा यांच्याशी बोलले असता माणगाव ला पोस्ट मार्टेम साठी घेऊन या असे उलट सांगितले. सामान्य शेतकरी मृत पशुधन घेऊन पन्नास किलोमीटर कसं जाईल. अशा बेजाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
- चंद्रकांत चाळके, सरपंच, शिस्ते.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशु पक्षी हे महत्वाचे घटक आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पदे रिक्त असणे हि मोठी खेदाची बाब आहे. पशु पक्षांवर उपचार होत नाही हीच मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पदभरती लवकर व्हावी अशी आमची मागणी आहे.