चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे सुधीर शिंदे यांची निवड
ओंकार रेळेकर-चिपळूण
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यपदी काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणुक प्रक्रिया बुधवारी येथील नगर परिषदेत ऑनलाईनद्वारे झाली. यावेळी भाजप नगरसेवक व काँग्रेसचे नगरसेवक करामत मिठागरी अनुपस्थित होते. या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आदींनी अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या महिनाभरापूर्वी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजप उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. महाविकास आघाडीकडे उपनगराध्यक्षपदासाठी पुरेसे संख्याबळ असल्याने उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा सुरू होती. मात्र, यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते सुधीर शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपनगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या सुधीर शिंदे यांच्या नावावर एकमत झाले. दरम्यान, प्रशासनाकडून उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. यानुसार बुधवारी येथील नगर परिषदेत निवडणूक प्रक्रिया झाली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी काम केले. बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. तर पुढील प्रक्रिया होऊन या पदासाठी कोणाचाही अर्ज न आल्याने उपनगराध्यक्ष पदी सुधीर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशांचा गजर करून परिसर दणाणून सोडण्यात आला.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे महाविकास आघाडीचे नेते तसेच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना धन्यवाद दिले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह नगरसेवकांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच वडील नगरसेवक झाले होते. मात्र, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होता आले नाही. मात्र, आपल्या उपनगराध्यक्षपदी निवडीने वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, हे सांगताना श्री. शिंदेंची डोळ्यात अश्रू तरळले.
या निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी नगरसेवक शिरीष काटकर, काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ निरीक्षक अशोक जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश राऊत, राष्ट्रवादी महिला जिल्ह्ध्यक्ष चित्रा चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, अर्बन बँक संचालक सतिशप्पा खेडेकर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, वैश्य समाज युवक संघटनेचे अध्यक्ष रोहन चौधरी, विलास चिपळूणकर, सुधीर जानवलकर, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, रघूशेठ मिरघल, माजी नगरसेवक रमेश खळे, श्रीनाथ खेडेकर, उदय ओतारी, विजय गांधी, अविनाश हरदारे, समीर जानवलकर, राजू जाधव, दीपिका कोतवडेकर, अक्षय केदारी, मनोज जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होती.