बेरोजगारांना आधार देण्यासाठी आधार फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सुधाकर वाघ-मुरबाड
आधार फाऊंडेशन मुरबाड ही संस्था गेल्या दोन ते तीन वर्षा पासून मुरबाड तालुक्यात कार्यरत असुन, या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या बेरोजगारांसाठी बेरोजगार उपक्रमांतर्गत मसाला व हळद उत्पादन प्रदर्शित समारंभ व सभासद संवाद मेळाव्याचे आयोजन मुरबाड तालुक्यातील शेलारी येथे नुकतेच करण्यात आले होते. "आधार फाऊंडेशन" या संस्थेच्या वतीने सतत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. आज आधार फाऊंडेशन संस्थेच्या बेरोजगार उपक्रमांतर्गत अत्यंत जिव्हाळ्याच्या व घरगुती गरजेच्या आणि उपयुक्त अशा हळद व मसाला उत्पादनाचे प्रत्यक्ष मार्केटमध्ये वितरण व जाहिरातीसाठी शेलारी येथे माजी सरपंच गजानन भोईर यांच्या फार्महाऊसवर कमलनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी ठाणे जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास कोर, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, दिनेश कथोरे, अपर्णा खाडे, मोहन सासे, छाया चौधरी, मोहन भावार्थे, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, तसेच गजानन भोईर, नितीन राणे, संजय घुडे, अमोल शिंदे, दत्तात्रेय ढमके तसेच आधार फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आधार फाऊंडेशन मध्ये गेली वर्षभर उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नवीन सभासदांना मुरबाड तालुका कार्यकारिणी सक्रीय सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली .