मयूर शेळके या तरुणाचे धाडसी पाऊल आणि वाचला चिमुरड्याचा जीव;
तळवडे गावातील तरुणाचे अतुलनीय धाडस
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तळवडे गावातील रेल्वे पॉइंट्स मन म्हणून काम करणाऱ्या मयूर शेळकेने खूप मोठे धाडस दाखवत एका चिमुरड्याचा जीव वाचवला आहे. त्याने दाखवलेल्या या धाडसाबद्दल सर्वस्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वांगणी या मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर पॉइंट्स मन म्हणून मयूर शेळके हा तळवडे येथील तरुण काम करत आहे. काल शनिवारी मयुरच्या असे लक्षात आले की एक अंध स्त्री आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानक मुलाचा हात सुटून मुलगा रेल्वे ट्रॅक वर पडला आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्याने धाव घेत मुलाला प्लॅटफॉर्म वर ठेवले व स्वतःही उडी मारत प्लॅटफॉर्म वर आला. काही सेकंदात तिथे पॅसेंजर ट्रेन येत असल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला होता. सेकंदाचा वेळ गेला असता तरी ही मुलासह स्वतचाही जीव मयूर गमावून बसला असता. म्हणूनच त्याने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक सर्वजण करताना दिसून येत आहे
मी कर्जत स्टेशन येथे 5 वर्ष काम केले असून सध्या पॉइंट्स मन म्हणून वांगणी येथे मागील आठ महिन्यांपासून काम करत आहे. सदर घटनेमधील स्त्री वांगणी येथील होती आणि अंध होती त्यामुळे तिच्या हातातून मुलगा निसटून ट्रॅक वर पडला. मुलाच्या जीवाला पॅसेंजर ट्रेन मुळे धोका होता म्हणून क्षणाचाही विलंब न लावता आणि जिवाची पर्वा न करता मी माझ्या जागेवरून धाव घेत मुलाकडे गेलो आणि त्याला प्लॅटफॉर्म ठेवला आणि मी सुध्दा उडी मारत स्टेशन वर पोहचलो. आणि त्या मुलाला वाचवण्यात मला यश आले . लोकांकडून होणारा कौतुकाचा वर्षाव हा मला खूप सुखावणारा आहे.