कुपवाडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर
उमेश पाटील -सांगली
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाने सर्वत्र कड़क संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या अनुशंगाने कुपवाड पोलिसांनी शहर आणि परिसरातून विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या हुल्लड़बाजी तरुणावर तसेच बंदीचा आदेश डावलून दुकाने उघडणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी दिली.
ड्रोनद्वारे छायाचित्रण करून रस्त्यावरून फिरणारे व गर्दी करून थांबणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाच्या संचारबंदी आदेशानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सर्वत्र कड़क कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड परिसरातील सर्व रस्ते, गलीबोळ, चौक आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी केल्यास ड्रोनद्वारे पाहणी करून कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंदी आदेश डावलून होणारी गर्दी टाळण्यासाठी कुपवाड पोलिसांनी खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी आज कुपवाड परिसरात ड्रोन कॅमेरा सोडून पाहणी केली. यावेळी कुपवाड मुख्य व सर्व अंर्तगत रस्ते व परिसरात ड्रोनच्या सहाय्याने छायाचित्रण करण्यात आले. काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. एकत्र येण्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये.नियम मोडणाऱ्याची आता गय केली जाणार नाही, असा इशारा कुपवाड पोलिसांनी दिला आहे.