दुर्गराज रायगडावर उत्खननात सापडली सोन्याची पुरातन कालीन बांगडी ;अनेक पुरातन कालीन वस्तू सापडल्याने दुर्गप्रेमी मध्ये उत्साहाचे वातावरण
नरेश कोळंबे -कर्जत
रायगड प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगड वर रायगडाला पुन्हा त्याचे वैभव देण्यासाठी उत्खनन चालू आहे . काल या उत्खननात पुरातन नाणी आणि सोन्याच्या बांगड्या सापडल्या आहेत.
रायगड प्राधिकरणामार्फत आतापर्यंत झालेल्या उत्खननात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत . याआधी येथे पुरातन कालीन तोफेचे गोळे सापडले आहेत. तसेच भांडी , नाणी आणि घरांची विशिष्ट प्रकारची कौलं सापडली आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातूपासून बनवलेली पुरातन मौल्यवान सोन्याची बांगडी सापडली आहे. अशाचप्रकारे पुढेही अनेक ऐतिहसिक वस्तुंसह वेगवेगळे अलंकार ही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती , वास्तुरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे. मिळालेल्या बांगडी वर असलेली कलाकुसर पाहता ही कोणत्या तरी राजघराण्यातील महिलेची बांगडी असल्याचे दिसत आहे. बांगडी वरील कलाकुसर पाहता त्याकाळी सुध्दा सोन्याची घडवणुक किती सफाईदार होती व तिला किती महत्त्व होते हे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी कोणकोणत्या गोष्टी गडावर मिळतील ? व त्यातून काय काय इतिहास बाहेर येतो ? हे पाहण्यासाठी दुर्गप्रेमी तसेच लाखो शिवभक्त उत्सुक आहेत.