मेढा नगरीचा सर्वांना सोबत घेऊन सर्वांगिण विकास करणार- आ . शिवेंद्रसिंहराजे बिनविरोध निवडीबद्दल मानले सर्वांचे आभार ; नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांचा सत्कार
प्रतीक मिसाळ - सातारा
सातारा- मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या- त्या वेळी सोडवले आहेत . सातारा- महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही , असा शब्द आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला . दरम्यान , सर्वांच्या विनंतीला मान देऊन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध पार पाडल्याबद्दल आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानले . मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ आणि उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांची बिनविरोध निवड झाली . निवडीनंतर दोघांचाही आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुखे , मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार , नगरसेवक शशिकांत गुरव , शामराव जवळ , दत्तात्रय वारागडे आदी मान्यवर उपस्थित होते . नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग जवळ आणि विकास देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता . निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे , ज्ञानदेव रांजणे यांनी देशपांडे यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती . विनंतीला मान देऊन देशपांडे यांनी अर्ज माघारी घेतला आणि जवळ यांची निवड बिनविरोध झाली . निवड बिनविरोध पार पाडल्याबद्दल आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवक देशपांडे यांच्यासह सर्वच नगरसेवकांचे आभार मानले . सर्वपक्षीय नगरसेवकांनी शब्दाचा मान राखून एकजूट दाखवली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो . आतापर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावली असून यापुढेही मेढा शहराच्याविकासासाठी वाट्टेल ते करू , असा शब्द आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला .