Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

२२ लाखाची दारू पकडणाऱ्या पोलीस रामटेके यांना वरिष्ठांकडून शाब्बासकी ऐवजी शिव्यांची लाखोली

 २२ लाखाची दारू पकडणाऱ्या पोलीस रामटेके यांना वरिष्ठांकडून शाब्बासकी ऐवजी शिव्यांची लाखोली

राजेंद्र मर्दाने-वरोरा



 *वरोरा* :  गुप्त सूचनेच्या आधारावर नेहमी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस  प्रवीण रामटेके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून व आमिषाला बळी न पडता शनिवारी पहाटे विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअपमधून २२ लाखाची दारु पकडून दिली व  स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याने वरिष्ठांनी त्यांना शाब्बासकी देण्याऐवजी शिव्यांची लाखोली वाहिल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

           पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांना एका  मुखबिराने वरोरा शहरातून चंद्रपूर कडे मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होणार असल्याचे कळविल्याने ते दोन पंचांना घेऊन नागपूर - चंद्रपूर हायवे वरील आनंदवन चौकात पोहोचले. सूचनेप्रमाणे विना  नंबर प्लेटवाली पिकअप भरधाव वेगाने येताना दिसताच त्यांनी संबंधित वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला पण त्याने न थांबता आणखी सुसाट वेगाने पळ काढला. पोलीस रामटेके यांनी आपल्या चारचाकी वाहनाने त्याचा पाठलाग करताच अशोक लेलँड कंपनीची पिकअप चालविणाऱ्या त्या वाहनचालकाने बोर्डा परिसरात गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. त्यांनी त्या गाडीची तपासणी केली असता ताडपत्री टाकून विदेशी दारू ठसाठस भरल्याचे निदर्शनात आले.



        विशेष म्हणजे सदर पिकअपला त्याच्या मालकाकडे सुस्थितीत पोहचविण्यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाच्या भ्रष्ट कर्मचार्‍यांकडून पायलेटिंग  करण्यात येत होते. अवैध दारू वाहतूक करणारे पिकअप पकडताच चंद्रपूर गुन्हे शाखेच्या एक दोन पोलिसांनी तसेच बंडू नावाच्या नामचीन दारू तस्करांने सदर गाडी सोडण्यासाठी पोलीस रामटेके यांच्याशी संपर्क साधला व सुरुवातीला विनंती नंतर दम दिला. शेवटी, रामटेके यांना वरोरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिका-यामार्फत सदर गाडी कोणतीही कारवाही न करता सोडून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. परंतु रामटेके यांनी तस्करांच्या व भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  दमबाजीला  तसेच चुकीच्या आदेशाला भीक न घालता आणि आमिषाला बळी न पडता अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावीत स्वतः फिर्यादी म्हणून तक्रार नोंदवित सदर पिकअप पोलीस स्टेशनला जमा केली.

        गाडी पोलीस स्टेशनला लागल्यानंतर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस  रामटेके याच्यावर शिव्यांचा भडिमार करण्यात आला. अवैध दारूची ऐवढी मोठी कार्यवाही एकट्याने एक हाती पार पाडून सुद्धा त्यांच्या मदतीला अपवाद वगळता कोणीच पोलीस कर्मचारी नव्हते. शेवटी रामटेके व त्यांच्या दोन पंचांनीच गाडीतून दारूचे खोके खाली उतरून मोजणी केली व नंतर तसेच गाडीत भरले. पिकअप गाडीत स्टर्लिंग रिझर्व्ह  बीएफ कंपनी, बॅच नंबर- २६० दि. २७/३ /२१  एकूण किंमत १ लाख ३६ हजार ४०० तसेच गो- गो प्रीमियम कंपनी बॅच नंबर- ४0 दि. ०३ / २१ एकूण किंमत ५ लाख ८३ हजार २००, रियल स्टार प्रिमियम कंपनी बॅच नंबर- १६ दि. ०३ / २० एकूण किंमत २ लाख३० हजार ४००, रियल प्रिमियम कंपनी बॅच नंबर- ३७ दि.०३/२१  एकूण किंमत ८ लाख ९२ हजार ८०० असा एकूण १८ लाख ४३ हजार २०० रु.चा मालाचा समावेश होता. विदेशी दारू करीता वापरलेली अशोक लेलन्ड कंपनीची पिकअप गाडी किंमत ४ लाख रुपये ताब्यात घेतली. एकूण विदेशी दारू व पिकअप मिळून २२ लाख ४३ हजार २००/ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. व  अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध क्र.३३७/२०२१ कलम ६५ (अ ) ८३ म.दा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     गुप्त सूचना मिळाल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे पार पाडून पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणाऱ्या पोलीस प्रवीण रामटेके यांना मात्र पहाटे तीन वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत उपाशीपोटी राहावे लागले. त्यांची साधी दखलही घ्यायला कोणी तयार नव्हते. जे काम पोलीस विभागाचे होते ते काम एकट्या पोलीस शिपायाने स्वबळावर केले असताना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन जाहीररीत्या त्याचा गौरव करण्याऐवजी  शिव्या व अपमानास्पद वागणूक मिळाल्याने पोलीस विभागात नेमके चालले आहे तरी काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

     रामटेके यांनी एवढी मोठी कायदेशीर कार्यवाही स्वबळावर करूनही त्यांच्या विरोधात असहकार पुकारणाऱ्या व त्यांचे मनोधैर्य खच्ची करणाऱ्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी जनतेची मागणी आहे. राजकारणी, दारू तस्कर व वरिष्ठ पोलिसांचे साटेलोटे असल्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावापुरती असून गावागावात दारूचा पूर वाहत असल्याचे चित्र आहे. हे त्वरित बंद न झाल्यास ' उद्धवा अजब तुझे सरकार ' असे बिनदिक्कतपणे जनता म्हणू लागेल व सरकारची प्रतिमा डागाळण्यास वेळ लागणार नाही, अशी जनतेत चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies