उदयनराजेंच्या "भीक मागो" आंदोलनाचे पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडून साभार परत
प्रतीक मिसाळ -सातारा
राज्यभर प्रचंड प्रमाणावर वाढलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने विकेंड लॉकडाउन पुकारला होता . शासनाच्या आदेशात सुधारणा करत सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते . जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी शनिवारी साताऱ्यात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले होते .आंदोलनावेळी उदयनराजेंनी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनावर टीका करत आपला संताप व्यक्त केला होता . यानंतर त्यांनी हातात थाळी घेत उपस्थितांकडून पैसे जमा केले . भीक मांगो आंदोलनातून जमा केलेल्या साडेचारशे रुपयांची रोकड असणारी थाळी घेऊन ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले . या वेळी त्यांनी लॉकडाउन मागे घ्यावाच लागेल , न घेतल्यास असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील , असा इशारा दिला होता .
त्याचवेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यावरही टीप्पणी केलेली होती . ते म्हणाले होते की माझ्या आयुष्यात असला बेकार कलेक्टर कधी पाहिला नव्हता , अशा शब्दात टीका केली होती . त्यांनी जिल्हाधिका - यांकडे राज्य सरकारकडे देण्याकरता दिलेले साडे चारशे रुपये जिल्हाधिकारयांनी खासदार उदयनराजेंना साभार परत केले . तेही मनीऑर्डरने आणि त्यासोबत दोन ओळीचे पत्र पाठवले आहे . त्यामध्ये आपण दिलेले रक्कम कायदेशीररित्या स्वीकारता येणार नाही , असे म्हटले होते . त्यामुळे आता खासदार उदयनराजे हे नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे .